दोन्ही शिवसेना आमनेसामने, इम्तियाज जलील यांची टीका
शिंदे गट, ठाकरे गट आमनेसामने आणि इम्तियाज जलील यांची टिका... प्रचाराच्या शेवटच्या दिवशी क्रांती चौकात राडा, पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला....
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरात शिवसेनेचे दोन्हीही गट आमने सामने आले, त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होती. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. सुमारे तासभर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होती. त्यामुळे क्रांती चौक चा परिसरातील वाहतुक ठप्प झाली होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सोमवारी 13 मे रोजी मतदान होणार आहे. शनिवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले होते. क्रांतीचौकातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकात खैरे यांच्या प्रचारासाठी दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पालिसांनी त्यांना क्रांती चौकातून फेरी काढण्यासाठी सकाळी साडेदहाची वेळ दिली होती. शिवसेनेने देखील दुचाकी फेरीचे आयोजन केले होते. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी ही फेरी काढण्यात येणार होती. पोलिसांनी त्यांना दुपारी बारा वाजताची परवानगी दिली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी नऊ वाजेपासूनच क्रांती चौकात जमू लागले. परंतु दुचाकी फेरी सुरु करायला बारा वाजले, दरम्यानच्या काळात शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी – कार्यकर्ते देखील क्रांती चौकात जमा होऊ लागले. त्यामुळे शिवसेनेचे दोन्हीही गट समोरासमोर आले. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेतृत्व भाजपचे नेते तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, उमेदवार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे , जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ करीत होते, तर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करीत होते. महाविकास आघाडीचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणा देत होते, तर महायुतीचे पदाधिकारी मोदी … मोदी अशा घोषणा देत होते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या विरोधात घोषणा दिल्या. घोषणाबाजी करता करता दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भीडले. त्यांच्या हातात झेंडे लावलेल्या काठ्या होत्या, त्या काठ्या काही कार्यकर्त्यांना लागल्या. महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याला चांगलाच चोप देण्यात आला. सुरुवातीच्या काळात क्रांती चौकात पोलिसांची संख्या कमी होती पण घोषणाबाजीची तीव्रता वाढू लागल्यामुळे पोलिस मोठ्या संख्येने क्रांती चौकात दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गाने जाण्याची सूचना पोलिसांनी केली. तासभरानंतर क्रांती चौकातील परिस्थिती नियंत्रणात आली आणि वाहतुक सुरळीत सुरु झाली.
हातात दारूच्या बाटल्या
महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या. अंबादास दानवे यांनी देखील हातात दारूच्या बाटल्या घेऊन संदीपान भुमरेंवर थेट आरोप केले. भुमरे यांची दारूची दुकाने आहेत असे म्हणत दानवे यांनी दारू देणारा पाहिजे की पाणी देणारा पाहिजे असा सवाल केला.
खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना दोन्ही शिवसेनेवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर असे राडा करणे हे अशोभनीय आहे हि आपली संस्कृती नाही तुम्ही असेच लढत जा मी दिल्लीचे तिकीट बुक केले आहे. यावेळी नवनित राणांवर सुध्दा त्यांनी जहरी टीका केली.
What's Your Reaction?