पानटपरी चालकांना आता कचराकुंडी व थुंकीपात्र ठेवा नसता दंडात्मक कारवाई होणार...!
 
                                पानटपरी चालकांनो आता कचराकुंडी व थुंकीपात्र ठेवा नसता दंडात्मक कारवाई होणार...
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नुकतेच महास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी मनपा प्रशासन नेहमी विविध उपक्रम आणि योजना राबवित आहे. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर हे स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी महानगरपालिका कटिबध्द आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे नितांत आवश्यक आहे.
शहरातील स्वच्छतेबाबत आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की, शहरातील रस्ते, चौक, मैदाने, उद्याने, मोकळया जागा आदी ठिकाणी गुटखा, पान मसाला, सुपारी, तंबाखु, सिगारेट यांची रिकामी पाकिटे अस्ताव्यस्त पडलेली आढळतात. त्यामुळे मोठया प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पानटपरी चालकाने दुकानाच्या जवळ कचराकुंडी (Dust Bin) व धुंकोपात्र ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन परिसरात पसरणारा प्लास्टिक कचरा नियंत्रित करता येईल. अशा प्रकारच्या कचराकुंडी (Dust Bin) व धुंकीपात्र ठेवणे बंधनकारक करण्यात येत आहे. डस्टबिन मध्ये जमा झालेला कचरा वर्गीकृत करुन महानगरपालिकेच्या घंटागाडीतच टाकावा. या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार
या पुढे शहरातील प्रत्येक पानटपरी धारकाने एक कचराकुंडी व धुंकीपात्र पानटपरी जवळ ठेवावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दंडाची आकारणी करताना प्रथम तपासणीत रुपये एक हजार, व्दितीय तपासणीत दोन हजार व तृतीय तपासणीमध्ये रुपये तीन हजार दंड वसुल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रविंद्र जोगदंड यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            