पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जिल्ह्याचा कृती आराखडा सर्वसमावेशक करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना
जिल्ह्याचा कृती आराखडा सर्वसमावेशक करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.28(डि-24 न्यूज)-प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने अंतर्गत देशातील शंभर आकांक्षित जिल्ह्यात राज्यातील ९ जिल्ह्यांचा समावेश असून त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हाही समाविष्ट आहे. या योजनेचा जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी जिल्ह्याचा कृती आराखडा विहित मुदतीत व सर्वसमावेशक करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हा कृती समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा जलसंधारण अदिकारी एन.पी. कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहा. आयुक्त पशुसंवर्धनडॉ. रमण इंगळे, कृषी विज्ञान केंद्र संचालक डॉ. दीप्ती पाटगावकर, उद्योग निरीक्षक ए.एस. जरारे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश असून त्यात कृषी उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण, पीक घनतेत वाढ, नैसर्गिक व सेंद्रीय शेतीला चालना, पाणी व्यवस्थापन, पीक काढणी पश्चात साठवणूक आणि मूल्यवर्धन, दीर्घ व अल्प मुदतीच्या कर्जाची सुविधा अशा पद्धतीच्या उपाययोजनांद्वारे कृषी विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत कृषी व फलोत्पादन, कृषी संशोधन व शिक्षण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सहकार विभाग, जलसंपदा, उद्योग, ग्रामविकास, भूजल संचालनालय, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभाग शा ११ विभागांच्या योजनांच्या अभिसरणातून हा जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करतांना संबंधित विभागांनी आपल्या विभागामार्फत राबवावयाच्या उपाययोजना, अंमलबजावणीचे टप्पे, त्यातून साध्य करावयाची उद्दिष्टे याबाबींचा अंतर्भाव करावा. जिल्ह्याचा कृती आराखडा सर्वसमावेशक करुन तो विहित मुदतीत सादर करावा,असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. जिल्ह्याच्या कृती आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण आणि कृषी पुरक उद्योग यांची सांगड घालावी, अन्न प्रक्रिया उत्पादने याबाबींची मूल्यवर्धित साखळी तयार करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण अशा शाश्वत उपाययोजनांचा समावेश करावा,असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?