पैठण गेट परिसरातील प्रसिद्ध लकी ज्यूस सेंटर व फ्रेश ज्यूस सेंटरवर एफडिएची धडक कारवाई...!

 0
पैठण गेट परिसरातील प्रसिद्ध लकी ज्यूस सेंटर व फ्रेश ज्यूस सेंटरवर एफडिएची धडक कारवाई...!

पैठण गेट परिसरातील लकी ज्युस सेंटर'वर FDA ची धडक कारवाई; मुदतबाह्य दूध व मॅंगो पल्प जप्त, अस्वच्छतेवरही ताशेरे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- शहरातील पैठण गेट परिसरातील प्रसिद्ध लकी ज्युस सेंटर येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. तपासणीदरम्यान मुदतबाह्य दूध व मुदत संपलेला मॅंगो पल्प वापरून ज्यूस तयार केला जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्टचा वापर केला जात असल्याचेही आढळून आले.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट देत संपूर्ण आस्थापनाची तपासणी केली. यावेळी अस्वच्छ वातावरण, अन्नपदार्थ साठवण्याची अयोग्य पद्धत आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याचेही स्पष्ट झाले. तपासणीदरम्यान आढळलेले मुदतबाह्य दूध, मॅंगो पल्प तसेच इतर संशयित अन्नपदार्थ ताब्यात घेऊन त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

या कारवाईदरम्यान परिसरातील फ्रेश ज्युस सेंटर आणि न्यू लकी ज्युस सेंटर यांचीही तपासणी करण्यात आली. या दोन्ही आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत संबंधित अन्नव्यवसायिकांना प्रशासनाने सक्त सूचना दिल्या. भविष्यात नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खाद्यपदार्थांची नियमित तपासणी केली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्नव्यवसायिकांविरोधात धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, ग्राहकांनीही कोणत्याही खाद्यपदार्थाची गुणवत्ता, वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची मुदत तसेच परिसरातील स्वच्छता याबाबत जागरूक राहावे, संशयास्पद प्रकार आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे शहरातील ज्यूस व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाने अधिक कडक मोहीम हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow