रेल्वे स्थानकावर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

 0
रेल्वे स्थानकावर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

नांदेड रेल्वे स्थानकावर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

नांदेड,दि.3(डि-24 न्यूज) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राचा उद्देश कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, कर्तव्यनिष्ठा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका याबाबत जागरूकता वाढवणे हा होता.

गाड्यांचे सुरक्षित व वेळेवर संचालन ही अत्यंत जबाबदारीची बाब असून, यासाठी जागरूकता, सतर्कता आणि नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. सत्रात या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. थकवा व अपघात टाळण्यासाठी पुरेशी व गुणवत्तापूर्ण झोप अत्यावश्यक आहे. विश्रांतीसाठी शांत व स्वच्छ वातावरण असणे गरजेचे आहे, यासाठी कुटुंबीयांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

मानसिक तणाव कमी करणे, एकाग्रता वाढवणे व मनःशांती मिळवण्यासाठी योग व ध्यान उपयुक्त आहेत. या बाबींचा रोजच्या जीवनशैलीत समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले. कुटुंबातील आनंदी व समजूतदार वातावरण हे कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत मोठा वाटा उचलते. सुसंवाद व सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

विश्रांतीच्या वेळी सोशल मिडिया किंवा मोबाईलचा अतिरेक टाळावा. यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडते व मानसिक थकवा वाढतो. नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य तपासणी यामुळे चांगले आरोग्य राखता येते. आजारांपासून संरक्षणासाठी या सवयी अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

वेळेवर व सकस अन्न सेवन केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि कर्तव्यात एकाग्रता राहते. कोणतेही औषध घेताना फक्त नोंदणीकृत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषधोपचार केल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

आर्थिक अडचणीत मोबाईल अ‍ॅप्सवरून घेतले जाणारे कर्ज मानसिक तणावास कारणीभूत ठरते. अशा गोष्टींपासून दूर राहून योग्य आर्थिक सल्ल्याचा अवलंब करावा.

सत्राच्या अखेरीस कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सक्रिय सहभाग घेतला. सत्रातून आरोग्य, मानसिक शांती व कार्यक्षमतेसाठी कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित झाले. रेल्वे प्रशासनाकडून अशा सत्रांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow