लाभार्थ्यांना घरकुलसाठी जागा व वाळू मोफत उपलब्ध करून द्या - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
ग्रामीण आवास योजनेचा आढावा;
लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा, मोफत वाळू उपलब्ध करून द्या; जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने गतीने घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील घरे नियमानुकूल करणे आणि घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी महसूल व ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम, जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे सभापती बालाजी सोनटक्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणाचे वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांची यादी, जागा, आराखडा आणि संबंधित कागदपत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावीत. जेणेकरून घरकुल मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येईल.
शासकीय किंवा गायरान जमिनीवरील लाभार्थ्यांच्या घरांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करून ती नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव सादर करावेत. वनविभागाच्या अखत्यारितील जमिनींसाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून प्रक्रिया गतीमान करावी,तसेच याबाबतचे परवानगीचे पत्र वन विभागांनी तात्काळ जिल्हा प्रशासनास सादर करावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळावी, यासाठी लाभार्थ्यांच्या घरापासून जवळ अंतरावर असलेल्या शासकीय वाळू डेपोतून ही वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महसूल आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने करून येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात.
शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या प्रस्तावातील त्रुटी मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ दूर करून लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत.याबाबत जिल्ह्यातील आवास योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मोहीम स्वरूपात सर्व यंत्रणेने सहभाग घ्यावा असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामविकास विभागाने परस्पर समन्वयाने काम करून प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी, गोर गरिबांना हक्काचा निवारा देण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून काम करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम. यांनी, जिल्ह्यातील ‘नशामुक्त अभियान’,बालविवाह मुक्त संभाजीनगर’ आणि ‘कुपोषणमुक्त बालक’ यासाठी पोलीस, उत्पादन शुल्क विभाग महिला बालविकास, महसूल आणि ग्रामविकास विभागाने या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन ते यशस्वी करण्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन यंत्रणेला केले.
गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील घरकुलासाठी मंजूर झालेल्या गायरान जमीन ग्रामपंचायसाठी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम. यांच्याकडे सुपूर्द केले .
What's Your Reaction?