विभागीय आयुक्तांनी घेतला पाणीपुरवठा योजनेचा आढावा...

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30, (डि-24 न्यूज) :- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. जायकवाडी धरणातील उद्भव विहीर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुदधीकरण केंद्राच्या सुरू असलेल्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेतली. शहर पाणीपुरवठा पाणीपुरवठा योजनेतील कामे विहित कालावधीत कामे पूर्ण करा, कोणत्याही परिस्थितीत कामामध्ये विलंब नको, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, मजीप्रचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, जल प्रशासन, पोलीस अधिकारी यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री पापळकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलचे काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणे, 26 एमएलडीचा टप्पा पूर्ण करणे यासह कंत्राटदारांने कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री वाढविण्यासोबतच मनुष्यबळही वाढवावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार कंपनी आणि महापालिकेच्या सबंधित यंत्रणेने आपसात समन्वय ठेवत ठरवून देण्यात आलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे. विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, जोडण्या पूर्ण करणे, टाक्यांचे बांधकाम आणि वितरण व्यवस्था जोडणीचे काम पूर्ण करा, तसेच जायकवाडी धरणक्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचे काम, फारोळा येथील 26 दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील 392 दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेत कामे विहित कालमर्यादेत पुर्ण करा, कोणत्याही परिस्थितीत कामात विलंब व्हायला नको, असेही विभागीय आयुक्त म्हणाले.
26 एमएलडीचा जलशुदधीकरण केंद्र फारोळा येथील टप्पा पूर्ण करण्यासाठी काही तांत्रिक कारणामुळे कंत्राटदाराने काम पुर्ण करण्यासाठी 20 ते 25 दिवसाचा कालावधी मागितला आहे, त्यासाठी 31 जुलैपर्यंत मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मुदत देण्यात देण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत काम विहित कालावधीत पुर्ण झाले पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






