शहराची वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी रिंग रोडची मागणी, मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

खासदार डॉ.कल्याण काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रिंग रोडसाठी दिले निवेदन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज): शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या रहदारीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ.कल्याण काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर साठी(औरंगाबाद )रिंग रोड निर्माण करण्याची मागणी केली.
खासदार काळे यांनी आपल्या निवेदनात शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीचा विचार करता, रिंग रोडची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढत असून, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी सुयोग्य वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे.
यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी निवेदनाची दखल घेतली आणि छत्रपती संभाजीनगरसाठी रिंग रोड प्रकल्पाबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरवासीय आणि स्थानिक उद्योजकांनी या मागणीचे स्वागत केले असून, लवकरात लवकर हा प्रकल्प मंजूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?






