श्यामसुंदर मुंदडांनी घरच्या घरी बजावला मतदानाचा हक्क

 0
श्यामसुंदर मुंदडांनी घरच्या घरी बजावला मतदानाचा हक्क

श्यामसुंदर मुंदडांनी घरच्या घरी बजावला आपला मतदानाचा हक्क

औरंगाबाद, दि.7 (डि-24 न्यूज) येथील अहिंसा नगरातील (विधान सभा क्षेत्र १०९- औरंगाबाद पूर्व) रहिवासी श्यामसुंदर मुंदडा या ८५ वर्षे वयाच्या दिव्यांग व्यक्तिने आज आपला मतदानाचा हक्क घरी बजावला. निवडणूक यंत्रणेतील अधिकारी- कर्मचारी यांनी घरी जाऊन त्यांचे मत नोंदवून घेतले.

 लोकसभा निवडणूक अंतर्गत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या मागणीनुसार घरीच मतदान करण्याची सुविधा देण्यात येत आहे. १९-औरंगाबाद मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आली. आज गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी मतदारसंघात घरी जाऊन दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मतदान घेण्यात आले. शहरातील अहिंसा नगर येथील शामसुंदर मुंदडा या ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदार यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांकडे फॉर्म १३ डी भरून दिला होता. त्यानुसार त्यांची घरी मतदान करण्याची मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार त्यांचे मतदान घरीच करून घेण्यासाठी निवडणूक विभागाने आज मतदान प्रक्रिया पार पाडली. 

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक पोहोचले घरी

 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी लिगदे, मतदान अधिकारी -१आर व्ही कोलते, मतदान अधिकारी -२ धनश्री वाघ ,एस टी लोखंडे, अश्विनी सोनार, पोलीस कर्मचारी मोहिनी मोहरे हे मुंदडा यांच्या घरी पोहोचले. त्यांना सर्व माहिती करुन दिली. त्यानंतर त्यांचे मतदान गोपनीय असावे यासाठी बुथ तयार करुन त्यांचे मतदान नोंदविण्यात आले. त्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली.   

मतदानाचा हक्क बजावल्याचे समाधान-श्यामसुंदर मुंदडा

 मतदान केल्यानंतर शामसुंदर मुंदडा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की ‘मी दिव्यांग आहे. मला चालता येत नाही. त्यात वय जास्त असल्यामुळे मला घराच्या बाहेर येऊन मतदान करणं अवघड होतं. म्हणून मी माझ्या इच्छेने घरूनच मतदान करण्याच्या पर्यायाची मागणी केली. त्यानुसार मला ही गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आणि आज मी घरीच मतदान केले. या सुविधेमुळे मला मतदानाचा हक्क बजावण्याचे समाधान आणि आनंद आहे. यामुळे मी निवडणूक आयोगाचे आणि आपल्या सर्व निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी- कर्मचारी यांचे आभार मानतो. 

 आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तिस मतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद आणि समाधान त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसले. घरीच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे त्रास न होता मतदानाचा हक्क बजावता आला. मतदान सहज सुलभ आणि आनंदात करता आलं, याचे समाधान मुंदडा कुटुंबातील अन्य सदस्यांनी व्यक्त केले. 

 एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असून गरज आहे आता फक्त मतदारांनी स्वयंप्रेरणेने मतदानाचा हक्क बजावण्याची.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow