संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा, मुख्यमंत्र्यांकडे खासदार संदिपान भुमरे यांची पत्राद्वारे मागणी
संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा - खासदार संदिपान भुमरे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8 (डि-24 न्यूज) – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपानराव भुमरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी 8 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
खासदार भुमरे यांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवांसमोर अत्यंत गंभीर व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या लहरीपणाचा आणि दीर्घ खंडाचा थेट परिणाम खरीप पिकांवर झाला असून अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यातील शेतकरी यापूर्वीच दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी तसेच बाजारभावातील चढ-उतार आणि वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला मोठा खर्च अक्षरशः वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून, घरातील दागिने गहाण ठेवून अथवा उसनवारी करून पिकांमध्ये पैसा गुंतविला आहे. मात्र आता पिके डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पिकांच्या नुकसानीपुरता मर्यादित नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न असल्याचे भुमरे यांनी नमूद केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील तालुकानिहाय पावसाचे प्रमाण, पेरणीची स्थिती, पिकांची वाढ, उपलब्ध पाणीसाठा, जमिनीतील ओलावा आणि पिकांचे संभाव्य नुकसान यांचा तातडीने शास्त्रीय पद्धतीने आढावा घेऊन पंचनामे व नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या विद्यमान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची कार्यवाही तातडीने करावी आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार संदिपानराव भुमरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
What's Your Reaction?