आता एफडीएचा मोर्चा बेकरीकडे...बायजीपुरात एका बेकरीचा परवाना निलंबित...!

 0
आता एफडीएचा मोर्चा बेकरीकडे...बायजीपुरात एका बेकरीचा परवाना निलंबित...!

अस्वच्छता, भ्रामक लेबलिंग आणि नियमभंगामुळे छत्रपती संभाजीनगरातील बेकरीचा परवाना निलंबित...

अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; ग्राहकांची दिशाभूल, घाणेरडे उत्पादन आणि अपूर्ण नोंदी आढळल्या...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "सेफ फूड, सेफ महाराष्ट्र" अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगरातील जुन्या बायजीपुरा परिसरातील येस फाईन बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान ग्राहकांची दिशाभूल करणारी भ्रामक लेबलिंग, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघडकीस आल्याने संबंधित बेकरीचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला.

तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी पाहिले की, बेकरीमध्ये 'बिग बाईट 20-20 रोस्टेड ब्रेड'चे उत्पादन व पॅकिंग सुरू होते. मात्र, प्रत्यक्षात ब्रेडचे उत्पादन येस फाईन बेकरीमध्ये होत असताना पॅकेटवर उत्पादक म्हणून दुसऱ्या 'गार्डन बेकरी'चे नाव व पत्ता छापण्यात आला होता. या प्रकारामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे स्पष्ट झाल्याने हा प्रकार अन्न सुरक्षा कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

याशिवाय उत्पादन विभागाची पाहणी करताना अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. उत्पादन परिसरात धूळ, कोळ्याची जाळी, गंज, मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, उघडे शौचालय, ब्रेड उत्पादनाजवळ विखुरलेला कचरा तसेच अस्वच्छ पाण्याच्या टाक्या आढळल्या. या परिस्थितीमुळे अन्न उत्पादनाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

तपासणीमध्ये पॅकेजिंगवरील आवश्यक माहितीही अपूर्ण असल्याचे समोर आले. ब्रेडच्या पॅकेटवर बॅच क्रमांक, उत्पादन व समाप्ती दिनांक तसेच इतर आवश्यक तपशील योग्य प्रकारे नमूद करण्यात आले नव्हते. याशिवाय कीटक नियंत्रण (Pest Control) यंत्रणा, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (FSMS), खरेदी-विक्रीची नोंदवही तसेच तांत्रिक तज्ज्ञाची नियुक्ती याबाबतही आवश्यक नोंदी उपलब्ध नव्हत्या.

या सर्व गंभीर अनियमितता लक्षात घेऊन अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे आणि सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांनी संबंधित बेकरीचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले.

अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले की, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार आहे. तसेच अन्न उत्पादन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता, योग्य लेबलिंग आणि कायद्यानुसार आवश्यक नोंदी ठेवणे बंधनकारक असल्याचे विभागाने पुन्हा अधोरेखित केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow