उरुसासाठी जाणा-या तिघांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू एक गंभीर जख्मी...!

 0
उरुसासाठी जाणा-या तिघांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू एक गंभीर जख्मी...!

उरुसासाठी निघालेल्या तिघांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- सुरू असलेल्या खुलताबाद येथील प्रसिद्ध उरुसात सहभागी होण्यासाठी जालना येथून निघालेल्या तीन मित्रांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अदालत रोडवरील रेमंड शोरूमसमोरील फ्लायओव्हरवर बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृतांची ओळख समीर शागीर शाह (वर 18) आणि परवेज अफसर शेख (वय 18), दोघेही रा. शास्त्री मोहल्ला, जालना तर या अपघातात अर्शद मदार शाह (वय 16) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाहनाला वाचविताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले...

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील आठ ते दहा युवकांचा एक गट बुधवारी खुलताबाद येथील उरुसासाठी निघाला होता. सर्वजण वेगवेगळ्या वाहनांतून प्रवास करीत होते. समीर, परवेज आणि अर्शद हे तिघे एका पल्सर दुचाकीवरून जात होते.

क्रांती चौक फ्लायओव्हरवरून अदालत रोडच्या दिशेने उतरत असताना रेमंड शोरूमसमोर अचानक एक वाहन दुचाकीच्या जवळ आल्याचे सांगण्यात येते. या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात समीरचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी घसरून तिघेही रस्त्यावर पडले. यावेळी समीर आणि परवेज हे रस्त्याच्या मध्यभागी पडले, तर अर्शद रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

अपघातानंतर उपस्थितांनी तातडीने तिन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र समीर आणि परवेज यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. अर्शदच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या कारणाचा पोलिसांकडून तपास...

घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. प्रत्यक्षदर्शी आणि उपस्थित युवकांचे जबाबही नोंदविण्यात येत आहेत.

मृतांच्या नातेवाइकांनी दुचाकीचा अपघात झाल्यानंतर एका छोट्या मालवाहू वाहनाने समीर आणि परवेज यांना चिरडल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात दुचाकीचा ताबा सुटून ती दुभाजकावर आदळल्याची बाब समोर आली आहे. दुसऱ्या वाहनाची भूमिका होती का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. संबंधित मालवाहू वाहन व चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

उरुसाच्या आनंदावर दुःखाची छाया...

समीर आणि परवेज हे मित्रांसोबत खुलताबादच्या उरुसात सहभागी होण्यासाठी घरातून आनंदाने निघाले होते. मात्र या प्रवासाचा दुर्दैवी शेवट झाला. परवेज हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात तीन बहिणी आहेत. त्याचे वडील बांधकाम क्षेत्रात मिस्त्री म्हणून काम करतात. समीरच्या कुटुंबात तीन बहिणी व दोन भाऊ असून त्याचे वडील खासगी काम करतात. जखमी अर्शद हा समीरचा चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात आले.

उरुसासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या या युवकांपैकी दोघांचा अचानक मृत्यू झाल्याने जालना शहरातील शास्त्री मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow