एमआयएम नेते युनुस पटेल यांनी आरोप फेटाळले म्हणाले मी मतीन नाही...!

 0
एमआयएम नेते युनुस पटेल यांनी आरोप फेटाळले म्हणाले मी मतीन नाही...!

एमआयएम नेते युनुस पटेल यांनी आरोप फेटाळले; म्हणाले, “मी मतीन नाही!”

पोल शिफ्टिंगच्या कामावरून वाद; राजगौरव वानखेडे यांच्यावर पलटवार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 31 (डि-24 न्यूज)- प्रभाग क्रमांक 1 मधील जटवाडा रोड परिसरात सुरू असलेल्या पोल शिफ्टिंगच्या कामावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हर्सुल येथील एमआयएमचे नेते युनुस पटेल यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पोल शिफ्टिंगचे काम बंद पाडण्यासाठी आपण अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दमदाटी केली नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक राजगौरव वानखेडे हे आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत असून, विकासकामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असल्याचे पटेल यांनी सांगितले.

युनुस पटेल म्हणाले की, “मी पोल शिफ्टिंगचे काम रोखले नाही. कामगारांकडे सेफ्टी बेल्ट आहे का, डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आहे का, तसेच त्यांचा विमा काढण्यात आला आहे का, एवढीच विचारणा ठेकेदाराकडे केली. पोलवर काम करताना एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, तसेच कामाचे इस्टिमेट आहे का, अशीही विचारणा केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यासाठी कोणतीही दमदाटी केली नाही,” असा दावा त्यांनी केला.

2 कोटी 25 लाखांच्या कामाचे टेंडर

पटेल यांनी पुढे सांगितले की, आपण आणि प्रभागातील चारही नगरसेवकांनी 2 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या वीज विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन पोल शिफ्टिंगचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुमारे 2 कोटी 25 लाख रुपयांच्या कामाचे टेंडर काढण्यात आले. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते तसेच प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत पोल शिफ्टिंगच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“प्रभागात पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. आम्ही प्रभागाच्या विकासासाठी काम करत आहोत. मग विकासकामात आम्ही अडथळा कधी आणला, हे राजगौरव वानखेडे यांनी सांगावे,” असेही पटेल म्हणाले.

“वानखेडेंवरही कारवाई करावी”

या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि आरोप करणाऱ्या राजगौरव वानखेडे यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी पटेल यांनी केली.

“वानखेडे यांनी त्यांच्या प्रभागातील विकासकामांकडे लक्ष द्यावे. आमच्या प्रभागात हस्तक्षेप करू नये. मी मतीन नाही,” असा टोला पटेल यांनी लगावला.

महापौर आणि उपमहापौर यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगत पटेल म्हणाले की, “माझी काही चूक असेल तर चौकशी करून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा किंवा नाही, याचा निर्णय संबंधित अधिकारी घेतील.”

नगरसेवक अशोक हिवराळे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत युनुस पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिले. यावेळी नगरसेवक अजहर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow