मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करा, सुनावणीची संधी द्या - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण
मतदाराच्या हक्काचे संरक्षण करा; सुनावणीची
संधी द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात प्रारुप मतदार याद्यांच्या प्रसिद्धी पश्चात आता जुळवणी न झालेले, विसंगती वा तफावत असणाऱ्या मतदार तपशिलाबाबत संबंधित प्रत्येक मतदाराला सुनावणीची संधी द्या.त्यांच्या मतदान हक्काचे संरक्षण करा. कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या म्हणजेच सुनावणीच्या टप्प्याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. अपर आयुक्त मनपा रणजीत पाटील,उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी रुपेश सिनगारे, नम्रता चाटे, डॉ. निलेश अपार, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नीलम बाफना, डॉ. व्यंकट राठोड, अरुण जऱ्हाड तसेच सर्व सहा. मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. निलेश अपार यांनी साधन व्यक्ती म्हणून प्रशिक्षण दिले. त्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी नंतर राबवावयाच्या सुनावणी प्रक्रियेसंदर्भात आजच्या प्रशिक्षणात माहिती देण्यात आली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमानुसार, मतदार यादी तयार करण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येईल. तसेच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावाबाबत अथवा नोंदीतील तपशीलाबाबत आक्षेप असल्यास दि. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करता येईल.
मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. 6, मतदार यादीतील नावाच्या समावेशास हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्र. 7, तर मतदार यादीतील नोंदींच्या तपशीलात दुरुस्ती, बदल अथवा अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. 8 मध्ये अर्ज करता येईल. हे दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याकडे विहित पद्धतीने सादर करता येतील.प्राप्त दावे व हरकतींची यादी दर आठवड्याला संबंधित मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दावे व हरकतींबाबतची माहिती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना आपल्या दाव्याची अथवा हरकतीची स्थिती संबंधित निवडणूक कार्यालयाकडून तपासता येईल.
प्रारूप मतदार यादी प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि अन्य तपशील तपासावेत. पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास विहित कालावधीत दावा दाखल करावा. तसेच आक्षेपार्ह अथवा अपात्र नोंद आढळल्यास त्याबाबत हरकत नोंदवावी.
प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पाहता येईल. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल वरही मतदार यादीची पडताळणी करता येईल.
मतदार नोंदणी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांनी आक्षेप असलेल्या प्रत्येक मतदाराचे समाधान करुन त्यांची सुनावणी घ्यावी. त्यासाठीची सर्व विहीत प्रक्रिया पार पाडावी. सुनावणीची नोटीस बीएलओ मार्फत प्रत्येक मतदाराच्या घरी नेण्यात यावी.सुनावणीच्या वेळी मतदारांना सोबत आणाव्या लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती द्यावी, इ. सुचना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आल्या.
What's Your Reaction?