हौसलो की उडान कार्यक्रमात येणार प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्काॅलरशिप वितरण होणार...!
हौसलो की उडान’ कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांची उपस्थिती
उच्च शिक्षण घेणाऱ्या 115 गरजू विद्यार्थ्यांना चेतना फाउंडेशनच्या वतीने स्कॉलरशिपचे वितरण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2 (डि-24 न्यूज) : गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणाऱ्या ‘हौसलो की उडान’ या उपक्रमाचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी तापडिया मंदिर येथे दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक उपस्थित राहणार असून, विद्यार्थ्यांना त्या प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.
‘बदल स्वीकारा, यश मिळवा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन 2013 पासून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जात आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपले भविष्य उज्ज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांचे अनुभव कार्यक्रमात मांडले जाणार असून, त्यातून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा व नवी ऊर्जा मिळणार आहे.
115 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
या कार्यक्रमात मेडिकल, इंजिनिअरिंग, सीए तसेच विविध उच्च शिक्षण घेणाऱ्या 115 गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वितरण करण्यात येणार आहे. मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रकल्प प्रमुख नितीन तोष्णीवाल, आकाश फुलझळके, कमल सारडा, सचिव मुरली गूंगे पाटील, उपाध्यक्ष मिताली लाठी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक रांदड यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी नितीन तोष्णीवाल आणि रमेश चंद्रसोनी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?