विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर द्या - राज्यपाल जिष्णू देव वर्मा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 67 वा पदवीदान समारंभ
विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्यावर भर द्या-राज्यपाल जिष्णु देव वर्मा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- पदवी तुम्हाला संधी देते मात्र क्षमता ही सिध्द करावी लागते. आगामी काळात राज्यातील विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रम राबविण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कुलपती तथा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 67 वा पदवीदान समारंभ दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने संपन्न झाला.विद्यापीठ नाट्यगृहात सकाळी साडेअकरा वा. हा सोहळा नेहमीच्या शिस्तबद्ध रीतीने पार पडला.विद्यापीठ परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना राज्यपाल वर्मा यांनी अभिवादन केले.
मुंबई येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा.अनिरुध्द पंडित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते, लोकभवनचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ संजय कवडे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.बी.एन.डोळे, विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.सय्यद अझरुद्दीन, डॉ.भास्कर साठे, डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.धनश्री महाजन, सहसंचालक डॉ .पंकजा वाघमारे, डॉ.किरण लाडाने, वित्त व लेखाधिकारी सविता जम्पावाड यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.गजानन सानप, काशिनाथ देवधर, डॉ.दीपक पाचपट्टे, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.रविकिरण सावंत, डॉ.अंकुश कदम, नितिन जाधव, डॉ.योगिता होके पाटील, ऍड. दत्तात्रय भांगे, डॉ.व्यंकटेश लांब, डॉ.अपर्णा
पाटील यांची उपस्थिती होती.
पदवीधर ज्ञानाचे वाहक - राज्यपाल वर्मा
राज्यपाल श्री.वर्मा पदवीधारकांशी संवाद साधतांना म्हणाले की, पदवीदान समारंभ हा विद्यापीठाच्या जीवनातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एक आहे. पदवीधारकांकडे विद्यापीठ हे ज्ञानाचे वाहक, मूल्यांचे वारसदार आणि भविष्याच्या निर्मितीमध्ये सहभागी असणारे नागरिक म्हणून पाहते. आज या विद्यापीठातून पदवी मिळत आहे ज्याला आधुनिक भारताचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लाभले आहे. म्हणून, ही पदवी केवळ शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक आहे. ती आपल्यासोबत एक जबाबदारी घेऊन येते; विचार करण्याची जबाबदारी, प्रश्न विचारण्याची जबाबदारी, सतत शिकण्याची जबाबदारी, मानवी प्रतिष्ठेचा आदर करण्याची जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शिक्षणात गुंतवणूक करणाऱ्या समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देण्याची जबाबदारी, असल्याचे राज्यपाल वर्मा म्हणाले.
बहुशाखीय दृष्टिकोन विकसीत...
ते पुढे म्हणाले की, हे विद्यापीठ गुणवत्ता, लवचिकता, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, नवसंशोधन, कौशल्य विकास, संशोधन आणि सामाजिक जबाबदारीवर आधारित नवीन शैक्षणिक संस्कृती विकसीत करीत आहे. मानवतेसमोरील आव्हाने केवळ एका विषयापुरती मर्यादित नाहीत. एकविसाव्या शतकातील विद्यापीठ हे असे ठिकाण असले पाहिजे जिथे विविध विद्याशाखा एकत्र येतील, संवाद साधतील आणि नवीन ज्ञानाची निर्मिती करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. वर्मा म्हणाले की, शिक्षण आणि पात्रता यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. पात्रता आपण काय पूर्ण केले आहे हे सांगते. शिक्षण आपल्याला सांगते की आपण काय करण्यास सक्षम झालो आहोत. म्हणूनच विद्यापीठाला पदवी-केंद्रितते कडून क्षमता-केंद्रिततेकडे जावे लागेल. कौशल्य शिक्षण उच्च शिक्षणाचा एक अविभाज्य भाग बनले पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.
आपल्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी संशोधन...
श्री. वर्मा यांनी मराठवाडा संशोधनाच्या संधींचे मोठे दालन आहे. आपल्या भागातील विविध समस्यांची सोडवण्यासाठी आपण कोणते ज्ञान निर्माण करू शकतो ? एखादे विद्यापीठ तेव्हाच सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण बनते जेव्हा त्याचे संशोधन प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांच्या भिंतींच्या पलीकडे पोहोचते,असे प्रतिपादन केले.
गुणवत्ता अन् सामाजिक बांधिलकी जपली –कुलगुरु डॉ.फुलारी..
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा नेटाने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुणवत्त अन् सामाजिक बांधिलकी हे ब्रिद आम्ही नेहमीच जतन केले आहे, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले.
ते म्हणाले की, विद्यापीठ शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे. मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर चेंबर (CMIA) यांच्या सहकार्याने तसेच 40 कंपन्यांसोबत सामंजस्य करार (MoUs) करून विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि उद्योगाभिमुख शिक्षणाच्या संधींचा विस्तार करण्यात येत आहे. गेल्या अडीच वर्षांत विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून तीन भव्य रोजगार मेळावे आणि कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये एकूण 130 कंपन्यांनी सहभाग घेतला. 6 हजार 440 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या, तर त्यापैकी 2 हजार 760 विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करा- प्रा. पंडित...
प्रमुख पाहुणे मुंबई येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा.अनिरुध्द पंडित यांनीही आपल्या भाषणातून स्नातकांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार देणारे व्हा. नवनव्या संकल्पनांसह उद्योग उभारा,असे आवाहन केले. हजारो वर्षांच्या मानवी इतिहासातील आजचा हा काळ सर्वाधिक वेगवान असून कृत्रिम बुध्दीमत्ता आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या या काळावर स्वार व्हा, असे डॉ.अनिरुध्द पंडित यांनी पदवीधरांना सांगितले.
ते म्हणाले की, तुम्ही अशा विद्यापीठातून पदवी प्राप्त करत आहात, ज्या विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र नाव लाभले आहे. डॉ. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, "शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याच्या हक्कांची जाणीव करून देते आणि त्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते."
मराठवाडा ही समृद्ध सांस्कृतिक वारसा, सखोल आध्यात्मिक परंपरा आणि क्रांतिकारी विचारांची भूमी आहे. अजिंठा आणि वेरूळच्या कालातीत कलावैभवापासून ते समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देणाऱ्या संत-कवींच्या विचार परंपरा पर्यंत या भूमीने समृद्ध वारसा जपला आहे. या ऐतिहासिक प्रदेशात उच्च शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आज हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी केंद्र म्हणून उभे आहे.
प्रा. पंडित म्हणाले की, यशाचा मार्ग कधीही सरळ नसतो. आयुष्यात तुम्हाला अनेक अडथळे, नकार आणि अपयशांना सामोरे जावे लागेल. मात्र, अपयशाला घाबरू नका. त्याकडे एक शिकवण आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी म्हणून पाहा.
तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिद्द आणि संकटांवर मात करण्याची क्षमता हाच महत्त्वाचा दुवा आहे. आजच्या जगात शॉर्टकटचा मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढत असताना तुमचे चारित्र्य हेच तुमचे सर्वांत मोठे भांडवल असेल. तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि सहानुभूती या मूल्यांना मार्गदर्शक स्थान द्या. बदलत्या भारताच्या भविष्याची जडणघडण करण्याची तुमची भूमिका काय असेल? भारतीय इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही पदवीधर होत आहात. आज भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. नवकल्पना, स्टार्टअप्स, वैज्ञानिक उपलब्धी आणि तरुण लोकसंख्येचे सामर्थ्य यांचे भारत हे एक महत्त्वपूर्ण केंद्र बनत आहे.जागतिक आव्हानांवरील उपाय शोधण्यासाठी संपूर्ण जग भारतातील तरुणांकडे आशेने पाहत आहे. याची जाणीव पदवीधरांनी ठेवावी, असे आवाहनही प्रा. पंडित यांनी केले.
प्रारंभी दीक्षांत मिरवणुकीने पाहुण्यांसह सर्व सदस्यांचे सभागृहात आगमन झाले. मिरवणुक नाट्यगृहात पोहोचल्यानंतर मुख्य समारंभ सुरु झाला. कुलपती यांनी दीक्षांत समारंभ सुरु झाल्याची घोषणा केली. विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल प्र-कुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते यांनी सादर केला. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र, मानव्यविद्या शाखा व आंतरविद्या शाखेतील पदव्या संदर्भातील वाचन अधिष्ठाता डॉ.भास्कर साठे, डॉ.सय्यद अझरुद्दीन, डॉ.धनश्री महाजन व डॉ.वैशाली खापर्डे यांनी केले. प्रारंभी वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.
डॉ.मुस्तजिब खान व डॉ. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
334 पीएचडी धारकांना पदवी प्रदान...
यंदाच्या दीक्षांत समारंभात स्नातकांना 334 पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. सर्वाधिक 131 संशोधक हे मानव्यविद्या शाखेचे आहेत. तर विज्ञान व तंत्रज्ञान - 124, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र - 31 आणि आंतरविद्या शाखेतील 48 संशोधकांना पदवी प्रदान करण्यात आली अशी माहिती, अशी माहिती संचालक डॉ.बी.एन.डोळे यांनी दिली. याशिवाय ऑक्टोबर -नोव्हेंबर 2025 मधील 10 हजार 331 तर मार्च-एप्रिल 2026 मधील 55 हजार 255 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठ कॅम्पसमधील 1639 पदवीधारक आहेत. 67 हजार 559 विद्यार्थ्यांना पदवी प्र
दान करण्यात आली.
What's Your Reaction?