किराडपुरा, आझाद चौक रस्ता बाधित रेती, खडी विटा विक्रेत्यांवर मनपाची कार्यवाई...!
रस्ताबाधित रेती, खडी व विटा विक्रेत्यांवर मनपाची धडक कारवाई...
किराडपुरा व एन-७ सिडको परिसरातून दोन हायवा साहित्य जप्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशान्वये तसेच मुख्य अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे व उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील रस्ताबाधित अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात रेती, खडी, विटा व बांधकाम साहित्य जप्त केले.
या मोहिमेअंतर्गत किराडपुरा येथील राम मंदिर रोड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण करून ठेवण्यात आलेल्या रेती, खडी व विटांच्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच एन-7 सिडको परिसरातील साखरे मंगल कार्यालय व गुलाब विश्व कार्यालय रोड येथेही रस्त्यालगत अडथळा निर्माण करणाऱ्या साहित्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवण्यात आलेली रेती, खडी, विटा तसेच इतर बांधकाम साहित्य आणि कचरा जप्त करण्यात आला. जप्त साहित्याची वाहतूक करून दोन मोठे हायवा भरून ते गरवारे स्टेडियम येथे जमा करण्यात आले.
शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे ठेवणे, नागरिकांची गैरसोय टाळणे आणि सार्वजनिक जागांचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अतिक्रमण करून सार्वजनिक रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
सदर कारवाई इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ तसेच नागरी मित्र पथकाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. मनपाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे होऊन वाहतुकीला दिलासा मिळाला
आहे.
What's Your Reaction?