गुंठेवारीत दिलासा परंतु दलाल सक्रिय, आयुक्तांनी लक्ष देण्याची काँग्रेसची मागणी...!
50 टक्के सवलतीतील गुंठेवारी योजनेचे स्वागत; दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्याची काँग्रेसची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 9 (डि-24 न्यूज) : छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात 50 टक्के सवलतीच्या दरात गुंठेवारी योजना सुरू केल्याबद्दल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, गुंठेवारीच्या कामासाठी नागरिकांची अभियंते व आर्किटेक्टच्या माध्यमातून होणारी कथित आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 50 टक्के सवलतीच्या दरात गुंठेवारीची योजना सुरू केल्यामुळे शहरातील सर्वसामान्य व गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, गुंठेवारीचे काम सुरू असताना संबंधित मालमत्ताधारकाची नोंद ठेवण्यासाठी आवक-जावक रजिस्टर असणे आवश्यक आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संबंधित मालमत्ताधारकांकडून काही अभियंते व आर्किटेक्ट मोठ्या रकमेची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने याबाबत स्पष्ट परिपत्रक काढून अभियंता व आर्किटेक्टमार्फत फाईल तयार करून संबंधित मालमत्ताधारकाकडे देण्यात यावी आणि महानगरपालिकेचे शुल्क संबंधित मालमत्ताधारकाने स्वतः चलनाद्वारे भरावे, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच फाईल तयार करण्यासाठी अभियंता व आर्किटेक्ट यांच्याकडून आकारण्यात येणारे शुल्कही निश्चित व पारदर्शक असावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडे दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फाईलची नोंद आवक-जावक रजिस्टरमध्ये करण्याची पद्धत महसूल विभागात सुरू आहे. एखाद्या फाईलमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित अभियंत्याने एकाच पत्राद्वारे कोणती त्रुटी आहे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती मालमत्ताधारकाला द्यावी, अशी सूचनाही काँग्रेसने केली आहे.
गुंठेवारी योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा आणि अभियंते व आर्किटेक्टच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी अॅड. सय्यद अक्रम यांनी केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, इक्बाल सिंग गिल, रामभाऊ लोखंडे, सुरेश पवार , शेख रईस, कैसर बाबा, राहुल सिरसाट, हकीम पटेल, नदीम पटेल, इरफान पठाण, नदीम सौदागर, मोहम्मद जाकेर, सय्यद फय्याजोद्दीन, अस्मत खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?