पुण्यानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश, हजारो विद्यार्थी रस्त्यावर...!
पुण्यानंतर MPSC विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरात आक्रोश... रोहित पवारांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांचा आक्रोश क्रांतीचौकात पाहायला मिळाला. शहरात विद्यार्थ्यांनी विराट मोर्चा काढत विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे.
यावेळी रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास हा असंतोष केवळ पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात जाईल असा इशारा दिला.
विद्यार्थ्यांचा हा आक्रोश सरकारला कालच स्पष्ट झाला होता. मात्र, आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा संताप दिसून येत आहे. सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन पोहोचवले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना हटवण्याची मागणी
रोहित पवार यांनी सरकारकडे केली आहे. तसेच पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या परीक्षांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
MPSC परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करून त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजप आणि ट्रोलर्सवरही निशाणा
राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी भाजपवरही टीका केली. सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना उद्देशून त्यांनी, “आता लिहून दिलेला मजकूर कॉपी करून ट्विट करणारे भाजपचे नेते आणि 40 पैसे कमेंटवर पोस्ट भरणारे बाजारू लोक, या सामान्य कुटुंबातील मुलांच्या आक्रोशाला नौटंकी म्हणणार का...?” असा सवाल उपस्थित केला.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
What's Your Reaction?