चक्क शेतात केली गांजाची लागवड, एकावर एनडिपिएस अंतर्गत गुन्हा दाखल...!
पैठण तालुक्यात 31 किलो गांज्याची बेकायदा लागवड उध्वस्त; 3.10 लाखांचा मुद्देमाल जप्त...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)-
अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत बिडकीन पोलिसांनी पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव परिसरात मोठी कारवाई करत शेतामध्ये केलेली गांज्याची बेकायदा लागवड उध्वस्त केली. या कारवाईत 31.006 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 3 लाख 10 हजार 60 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सुभाष आण्णा ओटे (वय 65, रा. मुलानी वाडगाव, ता. पैठण) याच्याविरुद्ध NDPS Act 1985 च्या कलम 20 अन्वये बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 437/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11.25 ते दुपारी 2.40 या वेळेत मुलानी वाडगाव येथील गट क्रमांक 52 मधील शेतात छापा टाकण्यात आला. यावेळी चार ठिकाणी गांज्याची झाडे लावून त्यांची निगा राखली जात असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान चार गाठींमध्ये एकूण 31.006 किलो गांजा जप्त करण्यात आला. पंचनामा करून हा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी नमुने जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शिवाजी शेळके यांनी दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सेना करीत आहेत.
प्राथमिक तपासात आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता गांज्याची लागवड करून त्याचे संगोपन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांच्या अवैध लागवड व तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
What's Your Reaction?