जालना शहरातील दहा एकर जमिनीवर आयेशाबी सय्यद यांचा दावा, सातबारा उता-यावरील नोंद दुरुस्त करण्याची मागणी
जालना शहरातील सरकारी दहा एकर जमिनीवर आयेशाबी सय्यद यांचा दावा; सातबारा उताऱ्यावरील नोंद दुरुस्त करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 9 (डि-24 न्यूज) – जालना शहरातील महापालिका हद्दीतील गट क्रमांक 255/1/1 मधील दहा एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला आहे. सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शासनाच्या नावाची नोंद झाली असून, ही नोंद चुकीची असल्याचा दावा श्रीमती आयेशाबी सय्यद सरवर यांच्या वारसदारांनी केला आहे.
या जमिनीचे मूळ खरेदीखत व इतर कागदपत्रे श्रीमती आयेशाबी सय्यद सरवर यांच्या नावाने असल्याचे त्यांचे वारसदार सय्यद अकबर यांनी सांगितले. सन 1976 मध्ये कौसर शेख पिता मिन्हाज शेख यांच्याकडून आयेशाबी सय्यद यांनी ही दहा एकर जमीन खरेदी केली होती. त्यासंदर्भातील खरेदीखत, जमिनीचा नकाशा, दाखला तसेच जुना सातबारा यांसह सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये सादर करण्यात आली आहेत.
मात्र, नव्याने सातबारा उतारा काढला असता त्यावर शासनाच्या नावाची नोंद झाल्याचे निदर्शनास आले. ही चुकीची नोंद दुरुस्त करून मूळ मालकाचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज करण्यात आले आहेत.
दरम्यान, 19 ऑगस्ट 2026 रोजी तहसीलदार, जालना यांनी मंडळ अधिकारी यांना पत्र पाठवून, 15 जुलै 2026 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची सुस्पष्ट शिफारस व परिपूर्ण कागदपत्रांसह अहवाल विनाविलंब कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अहवाल सादर करण्यास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
इतकी वर्षे कागदपत्रे सादर करूनही सातबारा उताऱ्यावर मूळ मालकाच्या नावाची नोंद झालेली नाही. त्यामुळे आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती दुरुस्ती करावी. अन्यथा विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात येईल. तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा सय्यद अकबर यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृहात दुपारी 3 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शेख बरकत उपस्थित होते. योग्य चौकशी करून मुळ मालकाची नोंद घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली
आहे.
What's Your Reaction?