चिकलठाणा परिसरात 5 वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ...!
चिकलठाणा परिसरात 5 वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ...
गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचा संशय...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगरात असलेल्या एका शेतात 5 वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद अवस्थेत मंगळवार, 19 मे रोजी मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयत चिमुकल्याची ओळख पटली नसल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, चिमुकल्याचा गुप्तधनासाठी नरबळी दिला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जालना रोडवरील चिकलठाणा परिसरात असलेल्या सावित्रीनगरातील एका शेताच्या नांगरटीमध्ये एका मुलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तात्काळ याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह गुन्हेशाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल केला. शेताच्या नांगरटीमध्ये चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने गुप्तधनासाठी हा नरबळी देण्यात आला असावा असा संशय परिसरातील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे वृत्त देईपर्यंत मयत मुलाची ओळख पटली नसल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्याच्या शेतात बालकाचा मृतदेह आढळून आला त्या शेतमालकाची देखील चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?