जायकवाडीचे जलशुध्दीकरण करणार काँग्रेस - माजीमंत्री अनिल पटेल

जायकवाडी धरणाचे जलशुद्धीकरण करून घ्यावे लागेल - माजी मंत्री अनिल पटेल
जलसंपदामंत्र्यांच्या हस्ते जलपूजनावर घेतला आक्षेप...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - जायकवाडीचे पाणी अडविणाऱ्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले, हि कृती मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. त्यांनी वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात न्यायालयात गेले होते अशा लोकांच्या हाताने पूजन केल्याने जायकवाडीचे पाणी दूषित झाले असून, आता आपल्याला जायकवाडीचे जलशुद्धीकरण करावे लागेल, अशा शब्दांत माजी मंत्री अनिल पटेल यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले. रविवारी गांधी भवनात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
जायकवाडी धरण 91 टक्के भरल्याने, शुक्रवारी धरणाचे 18 दरवाजे उघडून गोदापात्रात पाणी सोडण्यात आले, तत्पूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावर माजी मंत्री पटेल कडक शब्दांत जलसंपदा मंत्र्यांसह स्थानिक आमदार-खासदारांना फटकारले. पटेल म्हणाले की, शेतकरी, वारकरी यांच्या हस्ते जायकवाडीचे जलपूजन करायचे असते. पालकमंत्री संजय शिरसाट किंवा खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्तेही जलपूजन केले असते तरी चालले असते. जायकवाडीच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलने केली. मराठवाड्यातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले होते आमच्यावर आजही केसेस सुरू आहेत. शिरसाट हे त्यावेळी आमच्यासोबत आंदोलनात होते. तेव्हा ते मंत्री नव्हते. विद्यमान खासदार जुन्या घटनांकडे दुर्लक्ष करू शकतात. मात्र मराठवाड्याचे पाणी अडविणाऱ्यांचा आपल्याला विसर पडू शकत नाही. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी दिलेल्या लढ्यातील जखमा आजही कायम आहेत. जायकवाडीला पाणी मिळू नये, म्हणून मेंढेगिरी कमिटी बदलणाऱ्या माणसाच्या हस्ते जलपूजन केले, ही बाब क्लेशदायक आहे. त्यामुळे जायकवाडीचे आपण सगळे मिळून जलशुद्धीकरण करू, तरच हे पाप दूर होईल. आधी हे लोक आपल्याला पाणी देत नव्हते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जायकवाडी भरत होते. आता तिकडे पाऊस झाल्याने, त्यांच्या नाकात पाणी जात होते, म्हणून त्यांनी जायकवाडीत पाणी सोडले आहे, असेही पटेल म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना बोलावून जलशुध्दीकरण कार्यक्रम घ्यावा अशी विनंती खासदार डाॅ.कल्याण काळे यांच्याकडे अनिल पटेल यांच्याकडे गांधी भवन येथे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात केली.
सरकारमधील मंत्र्याच्या, खासदारांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे., आज आपण त्यावर बोलले पाहिजे., अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची कानउघडणी केली.
What's Your Reaction?






