दुष्काळ स्थितीत तलावांतील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे - मंत्री नितेश राणे
दुष्काळीस्थितीत तलावांमधील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे-
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डि-24 न्यूज)- दुष्काळी स्थितीत विभागातील तलावांमधील गाळ काढण्याचे काम केल्यास तलावांची पातळी वाढून मत्स्योत्पादन वाढेल. त्यामुळे तलावांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत,असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.
दुष्काळी पार्श्वभुमिवर कन्नड तालुक्यातील शिवणाटाकळी येथील तलावाची आज पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांना जालना जिल्ह्यातील तलावांची पाहणी केली व तेथील मच्छिमार बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर श्री. राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आढावा घेतला.
बैठकीस मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सह आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे, जलसंपदा व जलसंधारण विभागांचे अधिकारी तसेच बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, विभागातील 37 तालुक्यांमध्ये 386 पाटबंधारे तलाव आहेत. 389 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था कार्यरत असून त्याचे 15276 सभासद आहेत. एकूण जलक्षेत्र 47 हजार 47 हेक्टर इतके असून 743.64 लाख मत्स्यबीज संचयन क्षमता आहे. 19 हजार 432 मे.टन मत्स्योत्पादन क्षमता आहे. विभागात 4 शासकीय मत्स्यबीज केंद्र आहेत. अवर्षण स्थितीमुळे 106 तलाव कोरडे आहेत. 111 तलावांमध्ये 10 टक्के पेक्षा कमी तर 169 तलावांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा आहे.
मंत्री राणे म्हणाले की, मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी तलावांमधील गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे. आता तलाव कोरडे असल्याने हे काम केल्यास पातळी वाढून मत्स्योत्पादन वाढण्यास चालना मिळेल. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अंमलबजावणी करण्यासाठी बॅंकांनी मच्छिमारांना अर्थसहाय्य देण्यास सकारात्मक पवित्रा घ्यावा,असे निर्देशही त्यांनी दिले. त्यांनी सांगितले की, शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला असल्याने आता दुष्काळी उपाययोजनांचा भाग म्हणून मच्छिमारांनाही सर्वतोपरी सहकार्य करुन आधार देण्याचे काम करावे.
What's Your Reaction?