पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून, 48 तासात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

 0
पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून, 48 तासात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची हत्या; आरोपीला 48 तासांत जेरबंद...

 ग्रामीण पोलिसांची जलद कारवाई

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.28(डि-24 न्यूज): पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दिनांक 25 मे 2026 रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात एका 25 ते 27 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची नोंद करण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत तसेच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बसनोडे यांना तपासाचे निर्देश दिले.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच विविध जिल्ह्यांतील बेपत्ता व्यक्तींची माहिती पडताळली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने मृताची ओळख शेख आवेश उर्फ परवेज (वय 25, रा. विठ्ठल मंदिराजवळ, कसबा चौक, जालना) अशी पटली.

त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संशयित आरोपी शेख फैजान उर्फ शेख महेमूद (वय 25, रा. गल्ली नं. 4, रहमानिया कॉलनी, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर) याला 27 मे रोजी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती त्याचा मित्र होता. मात्र त्याची आरोपीच्या पत्नीवर वाईट नजर होती व तिची छेड काढत असल्यामुळे आरोपीच्या मनात राग निर्माण झाला होता. घटनेच्या दिवशी दोघे मद्यप्राशन करत असताना याच कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने दगडाने डोक्यावर वार करून मित्राची हत्या केल्याचे समोर आले.

या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 296/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी :

या कारवाईत पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश धुगे, पोहेकॉ कासिम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, बलवीर बहुरे, शिवाजी मगर, निलेश कुडे, चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बसनोडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे व अमलदार यांनी सहभाग घेतला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow