पदवीधर मतदारसंघात डॉ.प्रतापसिंह पाटील विजयी होतील - आमदार रोहित पवार
पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी होतील; आमदार रोहित पवार यांचा विश्वास
महायुतीच्या उमेदवाराबाबत नाराजी; पदवीधर, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २० (डि-24 न्यूज) : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा विजय होईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार दिला असून, पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता डॉ. पाटील यांच्यात आहे. त्यांच्या कुटुंबाचे, तसेच त्यांचे वडील वेदप्रकाश पाटील यांचे मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. महायुतीच्या उमेदवाराबाबत मतदारांमध्ये नाराजी असून, शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या निवडणुकीत डॉ. पाटील यांच्या पाठीशी उभा राहील, असेही पवार म्हणाले. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन आणि नगरसेवक नवीन ओबेरॉय उपस्थित होते.
पदवीधरांचे प्रश्न न सोडवल्याने सतीश चव्हाण यांच्यासमोर आव्हान
महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना अपेक्षित यश आलेले नाही. गंगापूर विधानसभा निवडणुकीतही मतदारांनी त्यांना नाकारले होते. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मात्र त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सतीश चव्हाण पुढे आले नाहीत. त्यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. पाटील यांना चांगली संधी असून, सतीश चव्हाण यांच्यासाठी विजयाचा मार्ग सोपा नसेल, असे पवार यांनी सांगितले.
शेतकरी मदतीवरून सरकारवर निशाणा
राज्यात शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक महागाई , बेरोजगारी विविध समस्यांनी त्रस्त आहेत. सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. दुष्काळावर उपाययोजना राबविण्यात यावी ती दिसत नाही आतापर्यंत चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत. मात्र, एवढ्या अल्प मदतीत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना प्रत्येकी 25 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अपेक्षित मदत मिळाली नाही, तर दिवाळी साजरी न करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच मंत्री, आमदार आणि खासदारांनाही दिवाळी साजरी करू देणार नसल्याचा इशारा दिल्याचे पवार यांनी नमूद केले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
राज्यात अभिनेता आणि राजकीय नेत्यांवर गोळीबाराच्या घटना घडत असून, कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक खराब झाल्याची टीका रोहित पवार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार सोडून एखाद्या आमदाराला पूर्णवेळ गृहमंत्रिपद द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची तयारी लवकर करा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नियोजित वेळेच्या एक वर्ष आधी होण्याची शक्यता व्यक्त करत रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतही भूमिका मांडली. काँग्रेस हा आघाडीतील मोठा पक्ष असल्याने त्यांनी प्रादेशिक पक्षांना विश्वासात घेऊन जागावाटपाची प्रक्रिया आधीच सुरू करावी. त्यानंतर एकत्रितपणे पुढील राजकीय दिशा ठरवावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
What's Your Reaction?