पराभवाचा धडा घेत आगामी काळात अधिक जोमाने लढा - अंबादास दानवे
पराभवाचा धडा घेत आगामी काळात अधिक जोमाने लढा,
शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे उमेदवारांना आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.17(डि-24 न्यूज)-: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक - 2026 मध्ये शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवारांची मातृभूमी प्रतिष्ठान, क्रांती चौक येथे, मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले..
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झालेला पराभव हा शेवट नसून नव्याने उभारी घेण्याची संधी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आणि उमेदवाराने आत्मपरीक्षण करून आगामी काळात अधिक ताकदीने जनतेमध्ये काम करावे. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी बूथस्तरावर सक्रिय राहणे, नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणे आणि पक्षाचे ध्येय धोरणे जनतेत पोहोचविणे आवश्यक असल्याचे अंबादास दानवे यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
पराभूत उमेदवारांचे मनोबल वाढवत आपण सर्वांनी एकदिलाने काम केल्यास आगामी निवडणुकांत निश्चितच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत संघटनात्मक बांधणीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना सुभाष पाटील यांनी केल्या.
आगामी राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पक्ष संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत करण्यात आला. याप्रसंगी उपनेते सुभाष पाटील, सहप्रमुख अनिल चोरडिया, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, अंकुश सुब, रमेश सावंत, अरविंद धिवर, पद्माकर इंगळे, बाबासाहेब मोहिते, तालूकाप्रमुख संजय मोटे, सोमीनाथ करपे, विष्णू जाधव, शंकर ठोंबरे, दिलीप मचे, सुभाष कानडे, जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, मनोज गायके व विठ्ठल डमाळे उपस्थित होते.
What's Your Reaction?