पाणचक्कीतील छोट्या रोपट्याचा वटवृक्ष, जागतिक महीला दिनानिमित्त मिर्झा अब्दुल कय्यूम यांचा विशेष लेख

8/मार्च विश्व महिला दिन विशेष
पाणचक्कीतील छोट्या रोपट्याचा वटवृक्ष : इन्सिया हुसेन रहीम यांची शैक्षणिक तपश्चर्या
लेख : मिर्झा अब्दुल कय्युम नदवी औरंगाबाद 9325203227
औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात इन्सिया हुसेन रहीम यांचं नाव आदराने घेतलं जातं. एका आईच्या तळमळीतून सुरु झालेली शैक्षणिक संस्था आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारली आहे. आपल्या मुलीला, तस्लीमला चांगलं शिक्षण मिळावं, या ध्येयाने इन्सिया यांनी १९८३ मध्ये पाणचक्की भागात आपल्या घराच्या परिसरात एका छोट्या नर्सरीची सुरुवात केली. त्यावेळी केवळ पाच मुलं तिथे शिकायला येत होती. आज याच संस्थेच्या अनेक शाखा औरंगाबाद आणि पुण्यामध्ये आहेत, आणि हजारो विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत.
मूळच्या मुंबईच्या असलेल्या इन्सिया यांचा विवाह १९७८ मध्ये औरंगाबादच्या अब्दुल हुसेन यांच्याशी झाला. मुलीच्या शिक्षणासाठी योग्य शाळा नसल्याने त्यांनी स्वतःच शाळा सुरु करायचं ठरवलं. पती अब्दुल हुसेन आणि सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्याने त्यांनी ३ ऑक्टोबर १९८३ रोजी आपल्या घरातच प्ले ग्रुप सुरु केला. डॉ. मंगला बोरकर यांचा मुलगा या शाळेतील पहिला विद्यार्थी होता. अकिला मॅडम या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या.
विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली, आणि इन्सिया यांनी १९८८ मध्ये नर्सरी सुरु केली. मुलांची चांगली काळजी आणि दर्जेदार शिक्षण यामुळे पालकांचा विश्वास वाढत गेला. याच विश्वासातून टॉडलर्स प्राथमिक शाळेची स्थापना झाली. १९९४ मध्ये सिडको एन ३ येथे टॉडलर्सची दुसरी शाखा सुरु झाली. त्यानंतर पालकांच्या आग्रहास्तव माध्यमिक शिक्षण देणारी 'स्टेपिंग स्टोन' शाळा सुरु करण्यात आली. सावंगी येथे या शाळेचं स्थलांतर झालं. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन २००८ मध्ये पाणचक्कीतील टॉडलर्स शाळा दिल्ली गेट येथे हलवण्यात आली. त्यानंतर ज्योतीनगरमध्येही शाळेची शाखा सुरु झाली.
इन्सिया यांच्या दोन्ही भावजयी फरिदा अखिल अव्वास आणि नसीम सैफ अच्चास यांनी शाळेच्या विस्तारात मोलाची मदत केली. इन्सिया यांचा मुलगा मुर्तुझा हुसेन आणि सून इन्सिया मुर्तुझा पुण्यातील शाळांची जबाबदारी सांभाळतात. आज या संस्थेत १६०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि १०० हून अधिक शिक्षक व ६० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. 'स्टेपिंग स्टोन' ही राज्यातील सीबीएसई पॅटर्नमधील पहिली ई-लर्निंग शाळा आहे, हा संस्थेचा मोठा सन्मान आहे.
एका आईच्या तळमळीतून सुरु झालेली ही शाळा आज अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत आहे. इन्सिया हुसेन रहीम यांनी शिस्त आणि आपुलकीच्या जोरावर औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण के
लं आहे.
What's Your Reaction?






