"प्रोजेक्ट आरोग्य मम्मे " चा शुभारंभ, 20 आशा सेविकांची मोफत मॅमोग्राफी तपासणी...!
प्रोजेक्ट आरोग्य मम्मे'चा शुभारंभ; 20 आशा सेविकांची मोफत मॅमोग्राफी तपासणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी 'प्रोजेक्ट आरोग्य मम्मे' या उपक्रमाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिकेतील महिला आशा सेविका तसेच वर्ग 3 व 4 मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात 20 आशा सेविकांची मोफत मॅमोग्राफी तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमास उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आरोग्य सभापती डॉ. सुनिता सोळुंके, नगरसेविका अनिता घोडेले, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. अजय रोटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अत्याधुनिक मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी कमलनयन बजाज हॉस्पिटल व वैद्यकीय तज्ज्ञांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले. महानगरपालिकेतील आशा सेविका आणि वर्ग 3 व 4 मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व जीवनदायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही आजाराचे वेळेत निदान झाल्यास त्यावर कमी खर्चात आणि प्रभावी उपचार शक्य होतात, तर उशिरा निदान झाल्यास उपचाराचा खर्च वाढतो आणि बरे होण्यासाठी अधिक वेळ लागतो, असे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी कमलनयन बजाज हॉस्पिटलचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. महानगरपालिका आणि आरोग्य संस्थांच्या समन्वयातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. अजय रोटे यांनी सांगितले की, कमलनयन बजाज हॉस्पिटल समाजहिताचे व लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवत असून, या अभियानामुळे अनेक महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचाराची संधी उपलब्ध होणार आहे.
कमलनयन बजाज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉर्ज नोएल फर्नांडिस यांनी सांगितले की, महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून वेळेत निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे उपचारयोग्य आहे. समाजातील प्रत्येक महिलेला दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने 'प्रोजेक्ट आरोग्य मम्मे' सुरू करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका, सामाजिक संस्था आणि विविध घटकांच्या सहकार्याने अधिकाधिक महिलांपर्यंत मोफत मॅमोग्राफी तपासणी पोहोचविण्याचा संकल्प असून महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
What's Your Reaction?