फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी 15 जानेवारीला विशेष अदालतींचे आयोजन
 
                                फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.15 रोजी विशेष अदालतींचे आयोजन
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश; दि.7 ते 15 कालबद्ध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढून शून्य प्रलंबितता आणण्यासाठी सर्व मंडळ अधिकारी यांच्यास्तरावर दि.15 रोजी महसूल अदालत आयोजीत करण्यात यावी व दि.17 पर्यंत तपशील अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी (दि.4) निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फेरफार प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रलंबित फेरफार प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही देण्यात आला आहे.
त्यानुसार, दि.7 ते दि.9 दरम्यान तहसिलदार यांनी त्यांच्या अधिनस्त मंडळनिहाय प्रलंबित फेरफार प्रकरणांचा आढावा घेणे, दि.9 ते दि.10 दुय्यम निबंधक यांच्याशी चर्चा करुन त्यांनी पाठविलेल्या खरेदी विक्री व्यवहाराचा आढावा घेणे, दि.13 रोजी फेरफार अदालतचे नियोजन करुन पूर्वप्रसिद्धीद्वारे सर्व संबंधितांना कळविणे व दि.15 रोजी प्रत्यक्ष फेरफार अदालत घेऊन प्रकरणे निकाली काढणे, असे वेळापत्रक देण्यात आले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल दि.17 रोजी द्यावयाचा आहे.
फेरफार अदालतीचे आयोजन करतांना मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात, कार्यालय नसल्यास ग्रामपंचायत किंवा शासकीय इमारतीत आयोजन करावे. संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संपूर्ण दप्तरासह सकाळी 9 वा. उपस्थित रहावे. शेतकऱ्यांना, नागरिकांना बसण्याची व्यवस्था, मंडळ अधिकारी, तलाठी यांना बसण्याची व्यवस्था, लागणारे साहित्य, संगणक इ. उपलब्ध करावे. फलक, इतिवृत्त व स्वाक्षरी रजिस्टर ठेवावे. वाद शंका असल्यास त्याबाबत सुनावणी त्याच दिवशी अदालतीच्या ठिकाणी घ्यावी. दोन्ही पक्षकारांना आगाऊ नोटीस द्यावी. तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी अदालतीचे नियोजन करावे. जेथे जादा प्रलंबितता आहे त्याठिकाणी अन्य अधिकारी यांची नियुक्ती करावी. छत्रपती संभाजीनगर शहर व इतर तालुका मुख्यालय याठिकाणी तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात फेरफार अदालत आयोजीत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            