बनावट दस्त प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

 0
बनावट दस्त प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

बनावट दस्त प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई...!

छत्रपती संभाजीनगरमधील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार; गुन्ह्यात एकूण सात आरोपी निष्पन्न

183/79 च्या दस्ताऐवजाची बनावट नोंद करून जमिनीच्या खरेदीखताची निर्मिती केल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28 (डि-24 न्यूज) – दुय्यम निबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर-1 येथील बनावट दस्त प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण सात आरोपी निष्पन्न झाले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल रशीद ऊर्फ डॉक्टर पिता अब्दुल रज्जाक आणि रवींद्र बाबुराव पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी प्रवीण माणिकचंद राठोड (वय 44, व्यवसाय नोकरी, रा. उलकानगरी प्लॉट क्रमांक 138/01, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 597/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 338, 336(2), 336(3), 337, 340, 341(4), 318(2), 318(4), 3(5) आणि 61(2)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 नोव्हेंबर 2026 रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर-1 येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

असा केला बनावट दस्ताचा प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून सह दुय्यम निबंधक कार्यालयातील शासकीय अभिलेखामधील सन 1979 च्या खंड बुक तसेच ई-बुकमध्ये दस्त क्रमांक 6027 ते 2030/79 अशी नोंद घातली. त्यानंतर मोहन दगडू राठोड यांच्या नावाचा बनावट खरेदीखत दस्त तयार करून दस्त क्रमांक 6027/79 ची दुय्यम निबंधक कार्यालयातून सत्यप्रत मिळविण्यात आली. या बनावट दस्ताच्या आधारे मौजे पोखरी येथील गट क्रमांक 66 मधील 5.99 हेक्टर जमिनीवर मालकी हक्क मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात मोहन दगडू राठोड, नितीन मोहन राठोड, सागर राम आगळे, प्रतीक सुरेश कोहळे आणि प्रशांत प्रकाश तांबे यांच्यासह अन्य आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

दोन आरोपींना अटक

या प्रकरणात अब्दुल रशीद ऊर्फ डॉक्टर पिता अब्दुल रज्जाक (वय 58, व्यवसाय मजुरी, रा. फ्लॅट क्रमांक 02, हुसेन कॉम्प्लेक्स, रोशन गेट, अजम कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) आणि रवींद्र बाबुराव पवार (वय 38, व्यवसाय खासगी सेवक, रा. श्री. कैलास चव्हाण यांच्या घरात, घर क्रमांक 12, रेणुकानगर, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना 28 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 12.28 वाजता अटक करण्यात आली. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत चिखलीकर, पोलीस हवालदार संतोष पारधे, नितीन घोडके, दीपक शिंदे, कैलास काकडे तसेच पोलीस अंमलदार मनोज विखणकर, विजय निकम आणि संतोष चोरे यांनी सहभाग घेतला.

बनावट दस्त प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील इतर आरोपींच्या सहभागाबाबतही पोलीस तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow