बनावट महिलेच्या सहाय्याने जमीन व्यवहारात 70 लाखांची फसवणूक, ब्रोकर सह महिलेला अटक...
बनावट महिलांच्या सहाय्याने जमीन व्यवहारात 70 लाखांची फसवणूक, ब्रोकरसह महीलेला अटक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज)- करमाड मधील गट क्रमांक 30 शेतीच्या बनावट व्यवहारातून तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला कुख्यात ब्रोकर राजू उर्फ कचरू विठ्ठल जाधव (राहणार पाल, तालूका फुलंब्री; सध्या रा. आईसाहेबनगर, हर्सूल याला पोलिसांनी हर्सूल टी-पॉइंट परिसरातून अटक केली. करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा र.क्र. 11/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता व लेखा प्रमाणक अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणातील फिर्यादी संतोष शिवाजी वैद्य, राहणार सातारा परिसर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली होती. जानेवारी 2025 मध्ये आरोपी राजू जाधव याने करमाड येथील गट क्र. 30 मधील 3 हेक्टर 84 आर शेती मुळ मालकांची असल्याचे भासवून इसारपावती करारनामा करून घेतला होता. मात्र, खरेदीखताची वेळ आली असता टाळाटाळ सुरू झाल्याने त्यांना संशय बळावला. चौकशीत तोतयागिरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या व्यवहारात फिर्यादीची सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. याच ब्रोकरमार्फत शारदा रायचुरी रंगदास यांनी मनोज गटकाळ, राहणार पाचोड यांच्याशी 75 आर जमिनीचा व्यवहार ठरवून 20 लाख रुपये उचलले. मात्र पुढील व्यवहार टाळण्यात आल्याने या प्रकरणाचाही तपास करण्यात आला. तपासात मूळ जमीन मालकांना या व्यवहारांची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. मूळ मालक पुरुष असताना त्यांच्या जागी बनावट महिलांना उभे करून इसारपावती करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दक्षिण भारतीय नावांची सरमिसळ करून फसवणुकीचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट आधार कार्डचा वापर करून बनावट नावाने स्वीकारलेले धनादेश बेंगळुरू येथील गजलक्ष्मी क्रेडिट को-ऑप. सोसायटीमार्फत बेकायदेशीररीत्या वटविण्यात आल्याचेही समोर आले असून, संबंधित संस्थेच्या चालकासही आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वी दि.23 जानेवारी रोजी वैशाली राजू जाधव, 35 वर्ष हिला अटक करण्यात आली असून ती सध्या पोलिस कोठडीत आहे. तोतयागिरी करणारी महिला ई. लता सुरेश, राहणार तिरुपती व इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
What's Your Reaction?