बाईक टॅक्सी विरोधातील आंदोलनाला यश आता रिक्षाचालकांची मीटर दरवाढ करण्याची मागणी...!
बाईक टॅक्सीविरोधातील आंदोलनाला यश; आता रिक्षांच्या मीटर दरवाढीची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 13 (डि-24 न्यूज) : शहरातून बाईक टॅक्सी हद्दपार करावी आणि संबंधित मोबाईल ॲप बंद करावेत, या मागणीसाठी शहरातील विविध रिक्षाचालक-मालक संघटनांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले आहे. बाईक टॅक्सीविरोधात कारवाई सुरू झाली असून काही वाहनांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाईक टॅक्सी पूर्णपणे हद्दपार करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी कायम ठेवली आहे.
दरम्यान, बाईक टॅक्सीविरोधातील आंदोलनानंतर आता रिक्षांच्या मीटर दरवाढीचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, या मागणीने जोर धरला आहे. यासंदर्भात रविवारी शहरातील विविध रिक्षाचालक-मालक संघटनांची बैठक झाली. बैठकीनंतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या मागण्या मांडल्या.
रिक्षाचालकांच्या मागणीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्राधिकरणाची बैठक घेऊन पहिल्या दीड किलोमीटरसाठी 30 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 20 रुपये असा नवीन मीटर दर निश्चित करावा. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादरण्यात येणार असल्याचे संघटनांनी सांगितले.
इंधनाचे वाढते दर, महागाई आणि गेल्या चार वर्षांपासून मीटर दरवाढीचा निर्णय न झाल्याने रिक्षाचालकांवर आर्थिक भार वाढत आहे, असा दावा संघटनांनी केला. त्यामुळे रिक्षाचालक-मालकांना दिलासा देण्यासाठी मीटर दरवाढीचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली.
यासोबतच रिक्षांच्या जुन्या मीटरच्या दुरुस्तीचा प्रश्नही संघटनांनी उपस्थित केला. शहरात मीटर दुरुस्तीसाठी अधिकृत एजन्सी नियुक्त करण्यात आलेली नसल्याने रिक्षाचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जुन्या मीटरच्या दुरुस्तीसाठी सुमारे 1,500 रुपयांचा खर्च येत असल्याने हा खर्च परवडणारा नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पर्याय म्हणून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यास रिक्षाचालक तयार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले.
इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रमाणपत्र मोफत उपलब्ध करून देण्यात यावे आणि त्याचे तातडीने नूतनीकरण करून रिक्षांचे पासिंग करण्याची सुविधा द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
बाईक टॅक्सीच्या प्रश्नानंतर आता रिक्षांच्या मीटर दरवाढीचा निर्णय तातडीने घेऊन रिक्षाचालक-मालकांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी शहरातील विविध रिक्षा संघटनांनी केली आहे.
यावेळी रिक्षाचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान, मनसे रिक्षाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जाकेर पठाण, रोशन ऑटो रिक्षाचालक युनियनचे कार्याध्यक्ष नाहीद फारुकी, अखिल भारतीय छावा चालक-मालक युनियनचे अध्यक्ष प्रकाश हेगडे, कार्याध्यक्ष दिपक पाटील, राजेश रावळकर, प्रभु प्रधान, गजानन वानखेडे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?