बेवारस वाहनांविरुध्द मनपाची धडक कारवाई, दोन दिवसांत 27 वाहने जप्त...

 0
बेवारस वाहनांविरुध्द मनपाची धडक कारवाई, दोन दिवसांत 27 वाहने जप्त...

बेवारस वाहनांविरुद्ध मनपाची धडक कारवाई; दोन दिवसांत 27 वाहने जप्त...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेमार्फत शहरातील रस्त्यांच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवार दि. 27 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत असून स्वच्छतेलाही चालना मिळत आहे.

रस्त्यांच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात तसेच स्वच्छता मोहिमेत अडथळा येतो. याशिवाय या वाहनांवर साचणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ होते. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि यांत्रिकी विभागाचे प्रमुख श्री. अनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या पथकांमध्ये यांत्रिकी विभाग, अतिक्रमण विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस विभाग यांचा समावेश असून संबंधित इमारत निरीक्षक आणि नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक यांनी देखील सहभाग घेतला.

शहरातील जालना रोड, बीड बायपास रोड, व्हीआयपी रोड, रेल्वे स्टेशन रोड, सुतारवाडी चौक आदी प्रमुख मार्गांवर ही कारवाई सुरू आहे. या मोहिमेत दुचाकीसाठी रु. 1,000, तीन चाकीसाठी रु. 2,000, चारचाकी (कार/जीप/टेम्पो) साठी रु. 5,000, मिनी ट्रक/ट्रॅक्टरसाठी रु. 10,000 तर जड वाहनांसाठी रु. 20,000 असा दंड आकारण्यात येत आहे. सदर दंड दर मनपा सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र. 927 दि. 12 फेब्रुवारी 2019 नुसार लागू आहे.

या मोहिमेअंतर्गत दि. 27 एप्रिल रोजी 9 वाहनांवर स्पॉट फाइन करण्यात आला असून 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच दि. 28 एप्रिल रोजी 12 वाहनांवर स्पॉट फाइन करून 15 वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त वाहनांचे मालकांनी तत्काळ दंड भरून आपली वाहने ताब्यात घ्यावीत, अन्यथा पुढील काही दिवसांत संबंधित वाहनांचा स्क्रॅप करून लिलाव करण्यात येणार आहे.

रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने सोडू नयेत, अन्यथा अशा प्रकारची कारवाई सातत्याने करण्यात येईल, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow