ब्लॅक स्पाॅट निर्मुलनाचा कृती आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

 0
ब्लॅक स्पाॅट निर्मुलनाचा कृती आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक...

‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा

तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)-जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांचे (ब्लॅक स्पॉट) स्थापत्य वा अन्य उपाययोजना करुन निर्मूलन करावयाचे आहे. त्यासाठी ज्या ज्या विभागांची जबाबदारी आहे, त्यानुसार कृती आराखडा तयार करा व कालबद्ध कार्यक्रम राबवून सर्व ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करा,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.

 जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अधीक्षक अभियंता एस.एस.भगत, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, कार्यकारी अभियंता श्रीमती प्रिया पुजारी, सहा. अधीक्षक अभियंता पूजा रावळे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप शेलार, पोलीस निरीक्षक महामार्ग विभाग किशोर चौधरी, उप अभियंता यांत्रिकी जयराज उदे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक अमरिश मानकर, अभियंता अनिकेत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर, पोलीस निरीक्षक वाहतुक आनंद झोटे, रोटरी क्लबच्या अध्यक्ष माधुरी सांगविकर, आदी मुख्यालयातून तर सेव्ह लाईफ फाऊंडेशन चे विशल वायकर, वैष्णवी कायाळकर आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा याविषयाबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा व त्या वेळापत्रकानुसार जिल्ह्याभरात जनजागृती करा. वाहन चालक- मालक यांच्यातही जनजागृती करा. 

 जिल्हाधिकारी गौडा पुढे म्हणाले की, रस्त्यांवरचे सर्व गतिरोधक हे निकषांप्रमाणे असावे. जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांबाबत स्थापत्य बदल, दिशा फलक, सुचना फलक, आवश्यक पट्टे मारणे इ. कामे करण्यासाठी संबंधित विभागांनुसार कामांचे वाटप करुन तात्काळ ही कामे पूर्ण करा. आवश्यकतेनुसार अत्याधुनिक कॅमेरे बसवा. वेगमापन यंत्रे बसवा. तसेच अपघातप्रवण स्थळांचे भौगोलिक अंकन स्थान माहिती सेवा पुरविणाऱ्या संस्थांना द्यावी व अपघातप्रवण स्थळाबाबत वाहनचालकास आगाऊ सुचना मोबाईलद्वारे देण्याबाबत उपाययोजना करावी. तसेच रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तिंना अपघात झाल्यापासून ते प्रत्यक्ष उपचार मिळण्याचा कालावधी हा कमीत कमी करण्याबाबतही उपाययोजना कराव्या. त्यासाठी 108 क्रमांक रुग्णवाहिकांची व्यवस्था सुसज्ज असावी. याबाबत सर्व संबंधित विभागांनी संयुक्त उपाययोजना राबवाव्या. अपघात घडलेल्या ठिकाणाची पोलीस, परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी व कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचवावी,असेही निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow