भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची नाही तर 500 कोटींची मालमत्ता भेट दिली...!
 
                                भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची नाही तर 500 कोटींची मालमत्ता भेट दिली...!
सालारजंग मिळकतीचे कायदेशीर वारस श्रीमती सय्यदा तय्यबा फातेमा पिता मीर अहेमद अली खान सामीस यांचे नोंदणीकृत जीपीए धारक शिवकुमार घुरेलाल चव्हाण यांचा खुलासा, पोलिस आयुक्तांकडे केली तक्रार...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)-
जिल्ह्याचे शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांना सालारजंग मिळकतीची 150 कोटींची मालमत्ता हिबानामा(भेट) म्हणून दिल्याचे समोर आल्यानंतर राजकीया क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकामागून एक खुलासे होत आहे. पोलिस आयुक्तालयातकडून या प्रकरणाची चौकशी सुरु असताना आणखी एक लेखी तक्रार श्रीमती सय्यदा तय्यबा फातेमा पिता मीर अहेमद अली खान सामीस यांचे नोंदणीकृत जीपीए धारक शिवकुमार घुरेलाल चव्हाण यांनी दाखल केली आहे.
आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणी 150 कोटी नाही तर अंदाजे 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.
जावेद रसूल शेख यांना मिळालेली मिळकत पूर्वीचा सर्वे नं.3, आताचा नगर भुमापन क्रं.14844 अ व 14844 ब यांचे संपूर्ण क्षेत्र 3 एकर नसून 12 एकर आहे. मीर महेमूद अली राहणार हैदराबाद यांनी सालारजंगचे अधिकृत वारस नसताना खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांना एक नव्हे दोन अनधिकृत हिबानामा करुन दिलेले आहे. यांचे क्षेत्र 3 एकर नसून 9 एकर आहे. याची अंदाजे किंमत 500 कोटी आहे. एवढेच नव्हे तर सदरील मिळकती महेमूद अली यांनी कित्येक लोकांना जीपीए, हिबानामा, अग्रीमेंट टू सेल करुन दिलेले आहे. या संदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. जेव्हा चौकशीसाठी आम्हाला बोलावतील सर्व कागदपत्रे घेवून पुरावे सादर करणार आहे की या जमिनीचा हिबानामा करुन देणारे मीर महेमूद अली खान हे सालारजंग मिळकतीचे कायदेशीर वारस नसून त्यांना या जमिनी बद्दल व्यवहार करण्याचा अधिकार नाही.
श्रीमती सय्यदा तय्यबा फातेमा पिता मीर अहेमद अली सामीस या सालारजंग मिळकतीच्या कायदेशीर वारस आहेत. त्यांनी हैदराबाद कोर्टामधून कायदेशीर वारसा प्रमाणपत्र मिळवले आहे. (संदर्भ OS 68/65, 1970 व O.S 2378/2005). सदरील वारसा प्रमाणपत्राची व आमची गुन्हे शाखा छत्रपती संभाजिनगर यांच्या द्वारे सत्यता पडताळणी व प्रमाणित केलेली आहे.
जे वारसाचे दावे करत आहे सालारजंग मिळकती विषयी शहरात घोटाळे करत आहे किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे त्यापैकी कोणीही न्यायालयाकडून सालारजंगचे कायदेशीर वारस निश्चित झालेले नाही.
काही लोक C.S.13/1958 या डिक्रीचा आधार घेऊन संबंधित शासकीय नगर भुमापन विभागाच्या अधिकारी यांच्याशी संगनमत करुन करोडो रुपये मुल्यांच्या जमीनीवर स्वतःचे नाव लावून कायद्याची, शासनाची, माझी व जनतेची फसवणूक करत आहे. C.S.13/1958 ही फायनल डिक्री नसून प्रिलिमिनरी डिक्री आहे. मागील 50 वर्षांपासून हि प्रिलिमिनरी डिक्री आहे ही फायनल झालेली नाही. तसा आदेश झालेला नाही भविष्यात होऊ शकेल असे वाटत नाही.
या डिक्रीच्या आधारे छत्रपती संभाजिनगर येथील सरकारी अधिका-यांना हाताशी धरुन सालारजंग मिळकतीच्या जमीनीचे गैरव्यवहार करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केला आहे. अनेक लोकांविरुध्द गुन्हे दाखल होऊन प्रकरणे कोर्टात प्रलंबित असताना पुन्हा पुन्हा ही जमीन विक्री करुन भ्रष्टाचार करत आहे. कथित भुमाफिया जमिनीसाठी एकमेकांच्या विरूध्द जातात नंतर आपसात तडजोड करतात. हे तडजोड पत्र कोर्टात सादर करुन Comprmise Deed करुन घेतात. अशा प्रकारे दिशाभुल करुन जमिनी हडपण्याचा प्रकार गेली अनेक दशके सुरु आहे. गेली अनेक वर्षापासून श्रीमती सय्यदा तय्यबा फातेमा यांचा जीपीए धारक म्हणून पोलिस, नगर भुमापन, महसूल मंत्रालय, न्यायालय अशा सर्व आघाड्यांवर लढत आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवकुमार घुरेलाल चव्हाण यांनी दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            