महापालिकेच्या विद्यार्थ्यांना चक्क गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण, प्रियदर्शनी विद्यालयाचा उपक्रम
विद्यार्थ्यांनी घेतला कवितेतील गोधडीचा प्रत्यक्षात अनुभव
प्रियदर्शनी विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिवली गोधडी...!
औरंगाबाद , दि.17(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व उप आयुक्त नंदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नव नवीन शैक्षणिक ,सामजिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रियदर्शनी विद्यालयात गोधडी शिवण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
प्रियदर्शनी विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात कवी
डॉ. कैलास दौंड यांची 'गोधडी' ही कविता शिकविण्यात आली .
गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांची किंवा जुन्या धोतराचे, जुन्या कपड्यांचे चौकोनी तुकडे करून एकावर एक ठेवून शिवलेली गोधडी.. त्याला आपण वाकळ ही म्हणतो. ही वाकळ म्हणजेच गोधडी. ही गोधडी आपणा सर्वांच्या आई-वडिलांच्या आजी-आजोबांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक मांडली जाते. गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यांमधील प्रेममयी आणि जिव्हाळ्याच्या आठवणी भावस्पर्शी शब्दांमध्ये सांगितलेला आहे. अर्थात गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेन आणि प्रेमाने जपण्याचा वसा आणि वारसा आहे. याची जाणीव आपल्याला कवी ने या कवितेमध्ये करून दिलेले आहे. तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा अशी एक निश्चितपणे गोधडी असावी. मायेचा मुलायम स्पर्श हळुवारपणे जपणारी अशी गोधडी..
ही कविता शिकवत असताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गोधडी ही कशी असते ती कशी बनवली जाते याची प्रात्यक्षिक मुख्याध्यापक संजीव सोनार , वर्गशिक्षिका स्मिता मुळे, प्रकाश इंगळे यांनी शिकविले. शाळेमध्ये विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी घरून आपल्या आईच्या जुन्या साड्या आणून त्याच्या गोधडी शिवण्याचा आनंद घेतला.
गोधडी नेमकी कशाची बनवली जाते गोधडी नेमकी काय आहे तीचे महत्त्व काय आहे हे मुलांना सांगण्यासाठी प्रत्यक्ष वर्गामध्ये गोधडी शिवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
What's Your Reaction?