कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकार गतिमान, बच्छू कडूंनी घेतला आढावा, म्हणाले 3 अधिसूचना निघणार
कुणबी प्रमाणपत्रांसाठी सरकार गतिमान, बच्छू कडूंनी घेतला आढावा, म्हणाले तीन अधिसूचना निघणार....
औरंगाबाद,दि.16(डि-24 न्यूज) जुने दस्तावेजाच्या तपासणीमध्ये आढलेल्या कुणबी नोंदीवरून प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यात सगेसोयरे, नमुना क्र. 33,34 व पोलीस पाटील यांच्याकडील नोंदीही ग्राह्यधरण्याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार बच्छू कडू यांनी विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
प्रशासनाने शोधून काढलेल्या जुन्या कुणबी नोंदीवरून सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अक्रामक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी लवकच मुंबईकडे निघण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनापासून त्यांचे मन वळविण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केला जात आहेत. त्यासाठी त्यांनी आ. बच्छू कडू यांना पाठविले आहे. आज सकाळी त्यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांच्यासोबत बैठक घेऊन कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांचे वाटप याचा आढावा घेतला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ. बच्छू कडू यांनी सांगितले की, आतापर्यंत सापडलेल्या नोंदीवरून बारा हजार प्रमाणपत्रांचे वाटप झालेले आहे. नोंदी आढळून आलेल्या गावात दवंडी देऊन नागरिकांना नोंदींची माहिती देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील यंत्रणेकडूनच प्रमाणपत्र काढण्यासाठीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. किरकोळ गुन्हे व गंभीर गुन्हे यांची वर्गवारी करण्यात आली असून किरकोळ गुन्हे मागे घेण्याबाबत कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे आ. कडू यांनी सांगितले.
राज्यात 54 लाख नोंदी आढळून आल्या आहे. मराठवाड्यातील शोधलेल्या एक कोटी 94 लाख कागदपत्रांपैकी 36 हजार नोंदी आढळल्या आहेत. या नोंदीवरून सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्याबाबतचा मसुदा तयार केला असून तो जरांगे पाटील यांना दाखविल्यानंतर ही अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्याच बरोबर नमुना क्रं. 33, 34 आणि पोलीस पाटील, देवीची लस देतानाच्या नोंदी आणि भटजीकडील जुन्या नोंदीचा उपयोगही कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरावा याबाबतच्या अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याचे आ. कडू यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती.
वंशावळ ठरविण्यासाठी नवीन पथके
तपासणीमध्ये अनेक ठिकाणी जुन्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. मात्र या नोंदीमध्ये केवळ व्यक्तीचे आणि गावाचे नाव आहे. त्यामध्ये आडनाव आलेले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे खालील पीढीचे वारसदार कोण हे शोधणेही आवश्यक आहे. वंशवळ ठरविण्यासाठी नवीन पथके कामाला लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पुढील पंधरा दिवस हे काम चालणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
बोगस नोंदी बाबत..
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास सत्ताधारी पक्षातील मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. कुणबी नोंदीही बोगस असल्याने त्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी जाहीरपणे मंत्री छगन भुजबळ करत आहे. यावरून सत्ताधाऱ्यांतच विसंवाद आहे का, असा प्रश्न आ. कडू यांना विचारला असता त्यांनी स्पष्टपणे उत्तर देणे टाळले. ज्यांना या नोंदी बोगस आहेत असे वाटत असेल तर त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात, असे म्हणत त्यांनी उत्तर देण्यास टाळले.
What's Your Reaction?