मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी मागितली 15 हजारांची लाच, 5 हजारांची लाच घेताना पोलिस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात...!
मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी 15 हजारांची लाच; पोलीस अंमलदार 5 हजारांची लाच घेताना जाळ्यात...
छत्रपती संभाजीनगर, दि. 9(डि-24 न्यूज) -: पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासह तक्रारदाराच्या मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस अंमलदाराविरुद्ध कारवाई केली. यातील पोलीस अंमलदाराला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणातील तक्रारदार महिलेने दि. 7 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे लेखी तक्रार दिली होती. तक्रारदार व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (वय 41) आणि त्यांचे मदतनीस पोलीस अंमलदार सुभाष छगन राठोड (वय 36) हे तपासात मदत करण्यासाठी तसेच मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारीची पडताळणी दि. 7 सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. यावेळी आरोपी पोलीस उपनिरीक्षक पासलकर यांच्या समक्ष पोलीस अंमलदार सुभाष राठोड यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी 5 हजार रुपये स्वतः स्वीकारण्याचे त्याने मान्य केल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर दि. 8 सप्टेंबर रोजी एसीबीने सापळा रचला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पासलकर यांनी पंचांसमक्ष दोन्ही हातांची दहा बोटे दाखवत तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस अंमलदार सुभाष राठोड यानेही 10 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर 5 हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली.
ठरल्याप्रमाणे सुभाष राठोड याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईवर पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांचे पर्यवेक्षण होते. पोहवा सिनकर व पोहवा तोडकर हे सापळा पथकात सहभागी होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
What's Your Reaction?