रस्ता सुरक्षा अभियान 2025, सुरक्षितता बाळगण्यात आहे "हिरोगिरी" - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
रस्ता सुरक्षा अभियान 2025
सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) वेगमर्यादेचे उल्लंघन करुन स्टंट करण्यात हिरोगिरी नसून;सुरक्षितता बाळगून वाहने चालविण्यात खरी हिरोगिरी आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी युवक युवतींना आवाहन केले.
रस्ता सुरक्षा अभियान 2025 चा प्रारंभ आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड, राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, पोलीस उपायुक्त वाहतुक शिलवंत नांदेडकर, अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. शशिकांत ढिकले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, सुरक्षा केवळ रस्त्यावरच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. समन्वय,सतर्कता आणि संयम अंगी बाळगला की सुरक्षित जीवनाचे समाधान लाभते. रस्ते सुरक्षिततेसाठी वाहनांची देखभाल दुरुस्ती वेळेवर करणे, वाहतुक नियमांचे पालन, व्यसनमुक्त राहण्याने आपला व आपल्यासोबत इतरांचाही प्रवास सुरक्षित होतो. ‘वाहनाचे स्टेअरिंग हे डेअरिंग दाखविण्याची जागा नाही’, याचे भान वाहन चालवितांना असले पाहिजे. अपघात कमी करण्याचा संकल्प यानिमित्ताने सगळ्यांनी करावा. रस्त्यावर सुरक्षितता बाळगण्यात हिरोगिरी आहे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक अपघात टाळता येतो- डॉ. विनयकुमार राठोड
प्रत्येक अपघात हा थोड्याशा खबरदारीने, काळजीने, उपाययोजनांनी टाळता येऊ शकतो. केवळ हलगर्जीपणा, अतिआत्मविश्वास, अनाठायी धाडस यामुळेच अपघात होत असतात. प्रत्येकाने खबरदारी बाळगली तर प्रत्येक अपघात टाळता येऊ शकतो,असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले.
प्रास्ताविकात विजय काठोळे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 670 मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहेत. हे सर्व मृत्यू आपण टाळू शकलो असतो. केवळ हेल्मेट न वापरल्याने त्यातील अनेक मृत्यू झाले आहेत. ‘परवाह अर्थात केअर’, असे या वर्षीच्या अभियानाचे ब्रीद वाक्य आहे,असे त्यांनी सांगितले. रुपाली दरेकर, डॉ. देशमुख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच प्रबोधनपर चित्रफितींचे प्रदर्शनही करण्यात आले. सविता पवार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी युवक युवतींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
What's Your Reaction?