रात्रीच्या वेळेस हर्सुलच्या मालमत्ताधारकांना नोटीस, पथकाला माघारी पाठवले
 
                                गुंठेवारी, बांधकाम परवानगी दाखवा
हर्सूलकरांना मनपाची नोटिस, नागरिकांनी पथकाला पाठविले माघारी...भींतीला चिकटलेले नोटीस फाडली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) - हर्सुल दोनशे फुट रस्त्यामध्ये बाधित मालमत्तेची बांधकाम परवानगी किंवा गुंठेवारी नियमितीकरण दाखला 7 दिवसांत सादर करा, अशा आशयाची नोटिस महापालिकेच्या झोन 4 च्या वतीने हर्सूलवासियांना बुधवारी रात्री देण्यात आल्या. मात्र रात्री कशाला नोटिस देता, आम्ही नोटिस घ्यायला तयार आहे, पण दिवसा कार्यालयीन वेळेत या, असे सांगत नागरिकांनी पथकाला माघारी पाठविले. भींतीला चिकटलेले नोटीस फाडली असल्याची माहीती सुत्रांनी दिली.
पोलीस आयुक्तालयात बुधवारी दुपारी मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात हर्सूलवासियांना नोटिस बजावून कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर झोन 4 च्या सहाय्यक आयुक्तांनी हर्सूलमधील बाधित मालमत्ताधारकांच्या नावे नोटिसा तयार केल्या. त्या घेवून मनपा कर्मचाऱ्यांचे पथक व पोलीस कर्मचारी हर्सूलमध्ये धडकले. मात्र नागरिकांनी नोटिस घेण्यास नकार दिला. सायंकाळी 6 वाजेनंतर मनपात गेलो तर कार्यालय बंद झाले असून, उद्या या असे सांगतात. आता रात्री तुम्ही 8 वाजेदरम्यान व नोटिस द्यायला आले आहे. परिसरात लाईटही गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही उद्या या, आम्ही नोटिस घेण्यास तयार आहोत. ज्यांच्या नावे मालमत्ता आहेत, त्यांच्या नावानेच नोटिस द्या., असे सांगत पथकाला माघारी पाठविल्याचे बाळासाहेब औताडे यांनी सांगितले.
काय लिहिले आहे नोटीशीत....
सात दिवसांत बाधित बांधकाम स्वतः काढून घ्यावे नसता यानंतर खर्चही वसूल करणार.
महापालिका ते स्वत: काढेल, व त्यासाठी होणारा खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल, असेही नोटिसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे..
नागरिकांना मोबदला द्या : पाटील
रस्ता मोठा करण्यास आमची हरकत नाही. विकासासाठी आम्ही सहकार्य करू. परंतू आमच्या मालमत्तेचा मोबदला मिळालाच पाहिजे. प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोहीम राबवावी. नागरिकांना मोबदला द्यावा. अन्यथा न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही उत्तर देवू, त्यासाठी सर्व जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            