राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी, विविध कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी, विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)- राष्ट्रीय मतदार दिवस हा दरवर्षी 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. यंदाही यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मतदार जनजागृती करावी,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व यंत्रणा प्रमुखांना दिले.
यासंदर्भात आज दूरदृष्यप्रणाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, उमाकांत पारधी, तहसिलदार पल्लवी लिगदे हे मुख्यालयातून तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, शिक्षणाधिकारी आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, मतदार नोंदणी अधिकारीस्तर ते जिल्हास्तरापर्यंत विविध पातळीवर मतदारांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. मतदारांना शपथ देणे, मतदार ओळख पत्र वाटणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करणे. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रानिहाय उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, उत्कृष्ट कर्मचारी यांना सन्मानित करण्यात येईल. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, डिस्ट्रीक्ट आयकॉन, स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी अशा सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?






