तळपत्या उन्हात संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक रस्त्यावर

 0
तळपत्या उन्हात संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक रस्त्यावर

तळपत्या उन्हात संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक रस्त्यावर...

खंडणी मागायला, खून करायला लावणारा मोठा गुन्हेगार जेलमध्ये गेला पाहिजे - मनोज जरांगे पाटील 

 तर राज्य बंद पाडण्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा....

दिपक केदार यांची हाकेंवर जहरी टीका, प्रतीमोर्चे काढणार असाल तर दिला इशारा....

सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांचे कुटुंबातील सदस्य मोर्चात सहभागी... देशमुख यांची कन्या व सुर्यवंशी यांच्या भावाच्या डोळ्याती अश्रू अनावर....भाषण थांबवले...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) आज सकाळी तळपत्या उन्हात क्रांतीचौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करून मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व धर्मीय व सर्व पक्षीय मुक अक्रोश मोर्चा शांततेत काढण्यात आला. मोर्चात माता भगिनींनीही सहभाग नोंदवला. हातात न्याय द्या, न्याय द्या असे पोस्टर व भगवे आणि निळे झेंडे हातात घेऊन मोर्चेकरु पायी चालत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धडकले. यावेळी मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.

यावेळी प्रमुख नेत्यांनी भाषणे केली.

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शैलीत भाषण करताना सरकारला इशारा दिला. मोर्चाला संबंधित करताना त्यांनी सांगितले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाले असून, एक जण राहिला आहे, त्याचाही शोध लागेल, हि साखळी खूप मोठी आहे, राज्याने मागील 70-75 वर्षांत कधी बघितले नसेल, इतके स्ट्रॉेग नेटवर्क आहे. हि साधी गोष्ट समजू नका. सगळे सापडायला खूप दिवस लागणार आहे. या वेगवेगळ्या टिमा असून, खंडणी मागायला लावणारा, खून करायला लावणारा तो मोठा गुन्हेगार अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे अशी मागणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

जनआक्रोश मूक मोर्चाच्या दिल्ली गेट येथील जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, खंडणी मागणारे, खून करणारे, घेवून पळणारे, पैसा पुरविणारे, झोपण्यासाठी जागा देणारे, एकठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे, डाके टाकणारे, छेडछाड करणारी वेगळी टिम अशा वेगवेगळ्या टिमा आहेत., आणि यांना सांभाळणारा एक जण आहे. त्याला आधी जेलमध्ये टाकले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने समाज आज शांत आहे., जर यातील एकही सुटला, तर सामना आमच्यासोबत आहे, हे तुम्ही कधीच विसरू नका. आमचा विश्वासघात केला, तर त्याला आम्ही रस्त्यावर आणतो, हे सरकारने पाठीमागेही बघितले आहे, पुढेही लक्षात ठेवावे, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.

खंडणी मागणाऱ्या व खून करणाऱ्या टिमला सांभाळले कोणी, त्या आठ-दहा दिवसांत त्यांचे किती वेळा संभाषण झाले. हे चार्जशीटमध्ये येणे गरजेचे आहे. नसता, आरोपी अटक केले, परंतू तो तपासात आलाच नाही, असे म्हणू नका. हि फसवणुक आहे. या प्रकरणातील शंभर-दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही, असे आम्हांला ज्या दिवशी दिसून येईल, त्या दिवशी राज्य बंद पाडू, असे जाहीर आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. सर्वपक्षीय म्हटले कि काही जण खूप कन्हतात., असे म्हणत त्यांनी समाजबांधवांचे कान टोचले, लेकीच्या हाकेला मान द्यायचे शिका, असा सल्लाही त्यांनी त्यांना दिला.

गोड बोलणाऱ्यांचा डाव ओळखणे शिका...

देशमुख व सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्यांच्या पाठीमागून इंचभरही हलणार नाही. फक्त जागरुक राहा, असे आवाहनही त्यांनी सर्व जातीधर्मातील तसेच मराठा बांधवांना जरांगे यांनी केले. गाफिल राहणे आता बंद करा. सावध पवित्रा घेणे आता शिका. समोरचा गोड बोलून डाव टाकतोय, तो डाव ओळखणे पुढील काळात मराठ्यांनी शिकले पाहिजे., असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

म्हणून धनंजय मुंडेंचे नाव घेतोय...

पुढील काळात अशी वेळ कुणावर येवू नये, म्हणून या धनंजय मुंडेंच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहे. त्याशिवाय चालणार नाही. कारण याने या टोळ्या उभ्या केल्या. मुंडेंचे नाव आपण घेत नव्हतो, पण धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात जावून धमकी देण्यात आली. त्याने त्याची लोकं शांत केली नाही, म्हणून आपण त्याचे नाव घ्यायला सुरवात केली. मुंडे हे त्यांच्या लोकांना थांबवत नाही, त्यामुळे या सर्व प्रकरणाला त्यांची मूक संमती आहे असे जरांगे म्हणाले. एकदा जर मराठा बिथरला, तर तुझी टोळी चटणीलाही पुरणार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला. राज्यात आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेले नाही., धनंजय मुंडेंच्या टोळीने मोर्चे काढण्यास सुरवात केली, हा एक नवा पायंडा राज्यात पाडला गेला आहे. या टोळ्यांनी मुंडेंची पत घातली, त्यांच्यावर मान खाली घालून चालण्याची वेळ आणल्याचेही ते म्हणाले.

यावेळी आनंदराज आंबेडकर, विरोधीपक्षनेते अंबादास, माजी खासदार इम्तियाज जलील, दिनकर ओंकार, दिपक केदार, सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व सुर्यवंशी यांच्या भावाने आपले मत मांडले.

अंबादास दानवे आपल्या भाषणात काय म्हणाले...

स्व. संतोष देशमुख व स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी जन आक्रोश मोर्चास अन्यायग्रस्त दोन्ही कुटुंबीयांसमवेत समस्थ समाज बाधवांसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित राहून मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाऊन प्रशासकिय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जात पात न पाळता विराट संख्येने समाज बांधव अन्यायविरोधात न्यायासाठी रस्त्यावर उतरला आहे. 

मागिल 40 दिवसांपासुन संतोष देशमुख यांची हत्या करणारे सर्व आरोपी अजुन पकडले जात नाही. राज्य सरकार सर्व तपास जलद गतीने सूरू असल्याचे सांगत असले तरीही वाल्मिक कराड यांना पकडण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागले आहे.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी विश्वातली साखळी एकच आहे. राज्य मंत्रिमंडळात धनंजय मुंडे राहिल्यामुळे न्यायावर परिणाम होण्याची प्रबळ शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता असल्याची भावना यावेळी मनोगतात व्यक्त केली. 

स्व.संतोष देशमुख आणि स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या अमानुषपणे झालेल्या हत्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अन्यायाची भावना असल्याने सदरील खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोन्ही कुटुंबांना तातडीने न्याय देण्यात यावा,अशी मागणी आज यावेळी केली.

इम्तियाज जलील यांचे अक्रामक भाषण...

म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज - जलील

उसके कत्ल के उपर मै चुप था, अब मेरा नंबर आया है, मेरे कत्ल पे तुम चूप हो, कल तुम्हारा नंबर आयेगा.., असा शेर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सादर केला. त्यामुळेच आपण सर्वांनी एकत्र येत, एकमेकांचे हात पकडून एक संदेश द्यायचा आहे., संतोष देशमुख यांची ज्याप्रमाणे निर्घृण हत्या करण्यात आली, ते पाहून हैवानाला सुद्धा लाज वाटेल. एक माणूस एका माणसाला अशा पद्धतीने मारू शकतो. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहोत, जोपर्यंत दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही असे आश्वासन त्यांनी पिडित कुटुंबियांना दिले.

 बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची निघृण हत्या करणाऱ्या गुंडगिरी प्रवृत्ती विरोधात काढण्यात आलेल्या मूक मोर्चातून आक्रोश व्यक्त करण्यात आला. या दोन्ही घटनांतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपींच्या मागे असलेल्या आकांवरही कारवाई व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हा मोर्चा जातीविरोधात नव्हे तर गुंडगिरी प्रवृत्तीविरोधात असल्याने, मोर्चात सर्वजातीय, सर्वधर्मीय बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती नोंदविली. यावेळी हातात विविध मागण्यांचे फलक घेवून महिला, लहान मुले, तरुण-तरुणींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. क्रांतीचौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून मोर्चात सहभागी बांधवांना सूचना दिल्या जात होत्या. निषेध मोर्चा असल्याने, काळ्या रिबीन व टाचपीनचे वाटपही करण्यात आले होते. याशिवाय विविध घोषणांचे फलक, भगवे झेंडेही उपलब्ध करून देण्यात आले होते. न्याय पाहिजे..अशी आर्त हाक देणारे बॅनर लावून एक रथ सजविण्यात आला होता.

मोर्चात पिडित कुटुंबातील सदस्य धनंजय देशमुख, वैभवी देशमुख, विराज देशमुख, प्रेमनाथ सूर्यवंशी, सत्यजित विटेकर, दिगबंर विटेकर यांच्यासह मराठा योद्धा मनोज जरांगे, आनंदराज आंबेडकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतीष चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण, माजी खासदार इम्तियाज जलील, नासेर सिद्दीकी, दिपक केदार, विनोद पाटील, राजू शिंदे, प्रा. माणिकराव शिंदे, सुरेश वाकडे, प्रा. चंद्रकांत भराट, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुढेकर, बाबासाहेब डांगे, कृष्णा पाटील डोणगावकर, अभिजित देशमुख, विठ्ठल बदर, बाळासाहेब थोरात, गोविंद उबाळे, विक्कीराजे पाटील, मनोज गायके, वरुण पाथ्रीकर, योगेश मसलगे, कृष्णा बनकर, अरुण बोर्डे, दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, गौतम खरात, मिलिंद दाभाडे, सचिन निकम, सुकन्या भोसले, रेखा वहाटुळे, सरोज मसलगे, डॉ. दिव्या पाटील, दिक्षा पवार, देवयानी डोणगावकर, मनिषा मराठे, हेमलता पाटील, कविता शिंदे यांच्यासह दलित संघटनांचे नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन गणपत म्हस्के यांनी केले.

मोर्चाच्या सुरवातीला बॅनर असलेले वाहन, त्यामागे महिला व नंतर पुरुष मंडळी असा क्रम ठरविण्यात आला होता. क्रांतीचौकातून सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. मात्र अनेक पुरुष मंडळी हि महिलांच्या आधी निघाली. हे पाहून नूतन कॉलनीत मोर्चा थांबविण्यात आला. यावेळी पुरुष मंडळी थांबा, महिलांना पुढे जावू द्या, असे जाहीर आवाहन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा पुढे निघाला. पैठण गेट, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटी चौक, नौबत दरवाजा, सुभेदारीसमोरून दिल्ली गेट येथे मोर्चा धडकला. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. पिडित कुटुंबिय व मुलींच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते दानवे, माजी खासदार जलील यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना निवेदन दिले.

मागण्यांच्या फलकांनी वेधले लक्ष

लढा फक्त माणुसकीचा., संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे. ना पक्ष, ना जात-पात केवळ अन्यायावर आघात., आम्ही येतोय, तुम्हीही या, आपल्या भावांना न्याय देण्यासाठी..., निघृण हत्येचा सूत्रधार वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना फासावर लटकवा. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे., आदी मागण्याचे फलक हाती घेवून सर्व समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.

घोषणांनी परिसर दणाणले...

मोर्चात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने महिला क्रांतीचौकात जमल्या होत्या. यावेळी त्यांनी या वाल्मीक कराडचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय., धनंजय मुंडे राजीनामा द्या., जय जिजाऊ जय शिवराय., आरोपींना फाशी झालीच पाहिजे., छत्रपती शिवाजी महाराज कि जय., अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे., आ

दी घोषणा देत उपस्थितांचे लक्ष वेधले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow