लाॅकडाऊनच्या अफवा खोट्या, इंधनाचा साठा 2 महीने पुरेल - पेट्रोलियम मंत्रालय

 0
लाॅकडाऊनच्या अफवा खोट्या, इंधनाचा साठा 2 महीने पुरेल - पेट्रोलियम मंत्रालय

'लॉकडाऊनच्या अफवा खोट्या; इंधनाचा साठा 2 महिने पुरेल'- पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली, दि.27(डि-24 न्यूज)- मध्यपूर्वेतील सध्या इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यामुळे जगभरात उर्जा संकट होण्याची भीती आहे. अशा परिस्थिती भारत सरकारनं देशाची ऊर्जा सुरक्षा आणि सागरी मार्गांच्या स्थितीबाबत माहिती दिली. पेट्रोलियम आणि नौवहन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सांगितलं की," आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. असे असले तरीही, भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. सागरी मार्ग पूर्णपणे सुरक्षित आहेत."

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा सुरक्षित पुरवठा- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी माहिती दिली इंधन साठ्याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की," आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 70 डॉलर्सवरून वाढून 100 डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही." पुढे त्यांनी म्हटलं की, "सोशल मीडियावर इंधनाच्या तुटवड्याबाबत फिरणाऱ्या बातम्या केवळ अफवा आहेत. आपल्याकडं पुढील दोन महिने पुरेल इतका कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्पांचे (Refineries) कामकाज त्यांच्या पूर्ण क्षमतेपेक्षाही अधिक क्षमतेनं सुरू आहेत. देशांतर्गत एलपीजीच्या (LPG) उत्पादनात सुमारे 40 टक्क्यांची वाढ झाली आहे."

घरगुती ग्राहकांना एलपीजी वितरणात प्राधान्य- भारताची एलपीजीची 90% गरज 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) मार्गे आयात केली जात आहे. त्यामुळे भारत सरकारनं देशांतर्गत एलपीजीच्या वितरणासाठी एक विशिष्ट रणनीती अवलंबली आहे. गॅस सिलिंडर वितरणात पहिले प्राधान्य: घरगुती ग्राहकांना असणार आहे.

व्यावसायिक पुरवठ्यात कपात-सुरुवातीला व्यावसायिक पुरवठ्यात कपात करण्यात आली होती. टप्प्याटप्प्यानं पुरवठा वाढवून 70% पर्यंत नेण्यात आला आहे. विशेषतः स्थलांतरित कामगारांना सुमारे 30,000 लहान (5किलो) सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे. औद्योगिक सुरक्षा: हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पोलाद, वस्त्रोद्योग आणि रसायने यांसारख्या प्रमुख उद्योगांना प्राधान्य तत्त्वावर गॅसचा पुरवठा केला जात आहे, असल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय खलाशी सुरक्षित-सागरी सुरक्षेबाबत अद्ययावत माहिती देताना, केंद्रीय नौवहन मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी स्पष्ट केलं की, आखाती प्रदेशात (Gulf region) भारतीय ध्वज असलेल्या जहाजांचा किंवा भारतीय खलाश्यांचा समावेश असलेली कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. सध्या, 20 जहाजांवर असलेले सर्व 540 भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. 'महासंचालक, नौवहन' (Directorate General of Shipping) यांचे संपर्क केंद्र 24 तास, सातही दिवस (24/7) कार्यरत आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमधील बंदरांसह, कोणत्याही भारतीय बंदरावर मालवाहतुकीच्या (cargo operations) कामकाजात कोणताही अडथळा आलेला नाही.

लॉकडाऊन लागू होणार नाही- दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना इंधनाच्या तुटवड्यामुळे लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. अशा प्रकारचे दावे पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोविड-19 महामारीच्या काळात निर्बंध लागू करण्यात आले होते. तशा प्रकारचे कोणतेही निर्बंध आता लादले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow