वक्फ मालमत्तेच्या गैरव्यवहाराची चौकशी करा अन्यथा इस्लाम पार्टीचा आंदोलनाचा इशारा...!
वक्फ मालमत्तेच्या गैरव्यवहाराची चौकशी करा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा...
I.S.L.A.M. पार्टीचे वक्फ मंडळाला स्मरणपत्र; दर्गाह कवडे शहा साहब प्रकरणासह इनामी जमिनींच्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- दर्गाह कवडे शहा साहब, घास मंडी, सिटी चौक येथील वक्फ मालमत्तेच्या लिलावातील गैरव्यवहार, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या अखत्यारीतील इनामी जमिनींवरील अतिक्रमण व अनियमिततेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी I.S.L.A.M. पार्टीचे शहराध्यक्ष रफत यार खान यांनी केली आहे. याबाबत पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले.
I.S.L.A.M. पार्टीच्या वतीने यापूर्वी 13 जुलै 2026 रोजी वक्फ मंडळाकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, दीड महिन्याचा कालावधी उलटूनही या गंभीर तक्रारीवर ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने पक्षाने पुन्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
सिटी चौक येथील दर्गाह कवडे शहा साहब येथील वक्फ मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लिलावाची जाहिरात सध्या प्रकाशित होत नसलेल्या वर्तमानपत्रात देण्यात आल्याचा आरोप असून, जाहिरातीमध्ये नमूद क्षेत्रफळापेक्षा वेगळ्या क्षेत्रफळाचा लिलाव करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मौल्यवान वक्फ मालमत्ता अत्यल्प दराने भाडेतत्त्वावर देण्यात आली का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर मालमत्तेची 11 महिन्यांची लीज मुदत संपल्यानंतरही संबंधित जागा वक्फ मंडळाने आपल्या ताब्यात परत घेतलेली नसल्याचा मुद्दा स्मरणपत्रात उपस्थित करण्यात आला आहे. तक्रारी प्राप्त होऊनही संबंधित मालमत्तेबाबत प्रभावी चौकशी किंवा प्रत्यक्ष कारवाई का झाली नाही, असा सवाल I.S.L.A.M. पार्टीने केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वक्फ मंडळाच्या थेट अखत्यारीतील सुमारे 30 इनामी जमिनींच्या लावणी लिलावात मागील तीन-चार वर्षांपासून कोणीही सहभागी होत नसल्याची माहिती पक्षाने दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात यापैकी अनेक जमिनींवर व्यक्तींकडून अनधिकृतपणे शेती केली जात असून पिके घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या जमिनींबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास परिस्थिती असूनही अतिक्रमण हटविण्याची प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही स्मरणपत्रात करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाला वस्तुस्थितीची पूर्ण माहिती देण्यात आली का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
13 जुलै रोजी निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने वक्फ मंडळाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे रफत यार खान यांनी म्हटले आहे. दर्गाह कवडे शहा साहब येथील मालमत्ता अद्याप मंडळाच्या ताब्यात का घेण्यात आलेली नाही...? तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली आहे का? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का...? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून भविष्यात वक्फ मालमत्ता न्यायालयीन वादात अडकविण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंकाही पक्षाने व्यक्त केली आहे. मात्र, या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
मागण्यांचा ‘अल्टिम... I.S.L.A.M. पार्टीने स्मरणपत्रातून नऊ प्रमुख मागण्या केल्या आहेत. दर्गाह कवडे शहा साहब प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित मालमत्तेबाबत पुढील कोणताही व्यवहार करू नये, नियमबाह्य लीज आढळल्यास ती रद्द करून मालमत्तेचा ताबा वक्फ मंडळाने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व इनामी वक्फ जमिनींची विशेष तपासणी करून अतिक्रमणे हटवावीत, मागील तीन-चार वर्षांतील लावणी लिलाव, अर्ज, निविदा, भाडेपट्टे व आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करावे, तसेच दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विभागीय आणि आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वक्फ मालमत्ता ही कोणत्याही व्यक्तीची खासगी मालमत्ता नसून धार्मिक व सामाजिक उद्देशासाठी समर्पित असलेली मालमत्ता आहे. तिचे संरक्षण करणे ही वक्फ मंडळाची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे वक्फ मालमत्तेच्या संरक्षणात निष्काळजीपणा किंवा गैरप्रकार झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे, अशी भूमिका I.S.L.A.M. पार्टीने घेतली आहे.
या प्रकरणात तातडीने चौकशी करून प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली नाही, तर I.S.L.A.M. पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन, निदर्शने आणि मोर्चा काढण्यात येईल. गरज पडल्यास या प्रकरणासाठी कायदेशीर लढाही उभारण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष रफत यार खान यांनी दिला.
“वक्फ मालमत्तेच्या संरक्षणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष न करता निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा शहराध्यक्ष रफत यार खान यांनी दिला.
What's Your Reaction?