नाल्यावरील अतिक्रमणे काढण्याचे सभापतींचे आदेश...!

 0
नाल्यावरील अतिक्रमणे काढण्याचे सभापतींचे आदेश...!

सभापती यांचे जय भवानी नगर येथे नाल्यांवरील अतिक्रमण हटवून सफाईचे निर्देश...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 11 (डि-24 न्यूज)- जय भवानी नगर येथील नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नाल्यांची संपूर्ण सफाई करण्यात यावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरीये यांनी आज दिले.

आज सकाळी 8 वाजता त्यांनी जय भवानी नगर ते झेंडा चौक या भागातील नाल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान जय भवानी नगर येथे नाल्यामध्ये करण्यात आलेली एक बोरवेल त्यांच्या निदर्शनास आली. ही बोरवेल नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकते, असे सांगत त्यांनी सदरील बोरवेल तात्काळ हटविण्याचे आदेश दिले.

तसेच झेंडा चौक परिसरातील नाल्याची पाहणी करताना नाल्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेली एक भिंत आढळून आली. ही भिंत त्वरित पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय नाल्याच्या उघड्या भागावर जाळ्या बसविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी नगरसेवक श्री बालाजी मुंडे, नगरसेविका सुरेखा गायकवाड व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मागील सोमवारी सभापती श्री. मकरीये यांनी मोती कारंजा ते संभाजी पेठ (औरंगपुरा) या परिसरातील नाल्यांची पाहणी करून साफसफाईचे निर्देश दिले होते. आज त्यांनी त्या कामांचाही आढावा घेतला.

मोती कारंजा येथे सुरू असलेल्या नाला सफाई कामाची पाहणी करताना काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नाल्याची हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

औषधी भवन परिसरातही सुरू असलेल्या नाला सफाई कामाची त्यांनी पाहणी केली. संबंधित दोन्ही ठिकाणांवरील कामे पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow