स्वच्छ, सुंदर वेरुळसाठी सरसावले प्रशासन...केले श्रमदान...
स्वच्छ, सुंदर ‘वेरूळ’साठी सरसावले प्रशासन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 27(डि-24 न्यूज)- वेरूळ येथे प्रशासनाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हाप्रशासनातले सर्व वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासन वेरुळ स्वच्छ, सुंदर करण्यासाठी सरसावले. श्रमदानातून अवघ्या तीन तासात वेरुळ स्वच्छ करण्यात आले.
वेरुळ नगरपरिषदेने याकामी पुढाकार घेतला. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आ. प्रशांत बंब, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू,जिल्हा परिषद सदस्य कृणाल दांडगे, पं.स. सदस्य दिनेश अंभोरे, वेरुळ सरपंच कुसुमबाई प्रकाश मिसाळ, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव तसेच अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, न.पा. प्रशासन अधिकारी सौरभ जोशी तसेच सर्व विभागप्रमुख यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते.
वेरूळ हे जागतिक पर्यटन व धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण असून, येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. श्रावण महिन्यात भाविक पर्यटकांची संख्या जास्त असल्याने वेळच्या वेळी स्वच्छता राबवून निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाचा हा उपक्रम असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.
अभियानाची वैशिष्ट्ये...
स्वच्छता मोहिमेसाठी एकूण सुमारे 40 कचरा संकलन वाहने कार्यरत होती.
यापैकी 10 मोठी वाहने आणि 100 कर्मचारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले होते.
अभियानात स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत साधारणतः 400 अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
अभियानादरम्यान परिसरातून अंदाजे 50 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
वेरूळ लेणी परिसर, अरिहंत चौक, घृष्णेश्वर मंदिर परिसर, मालोजी राजे भोसले गढी परिसर व भोसले चौक परिसर या मुख्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
वेरूळ येथील विकासकामांची पाहणी...
वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात भक्ती निवास, नवीन दुकाने तसेच नवीन मार्गाच्या कामांची पाहणी करण्यात आली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्थानिक रहिवासी व दुकानदार यांच्याशीही यावेळी चर्चा करण्यात आली. या पाहणीदरम्यान परिसरातील विकासकामांचा आढावा घेऊन भाविक व पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आरोग्य विभागाचा सहभाग
या अभियानात आरोग्य विभागाने सक्रीय सहभाग घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान राऊत, डॉ. रंगनाथ तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आफताब शेख, डॉ. अविनाश बेरे, जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले.
*‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’चा संदेश*
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना समजावून सांगितले. निरोगी आरोग्य जीवनासाठी स्वच्छ परिसर, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि कचऱ्याचे योग्य विलगीकरण यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
What's Your Reaction?