विधानसभा निवडणुकीसाठी लागणार 16 हजारहून अधिक मनुष्यबळ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
विधानसभा निवडणुकीसाठी लागणार 16 हजारहून अधिक मनुष्यबळ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विधानसभा निवडणुकीसाठी लागणार 16 हजारहून अधिक मनुष्यबळ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)

विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर होताच प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण 31 लाख 76 हजार 830 मतदार असून मतदान केंद्राची संख्या 3 हजार 273 एवढी असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी करत नियमाचे पालन न करणा-ंयावर कठोर कारवाई होईल, असा इशारा दिला. शहर परिसरात चार मतदारसंघाचे स्ट्राँग रुम असेल असेही त्यांनी नमूद केले. 9 विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीचे काम करण्यासाठी 16 हजार हुन अधिक मनुष्यबळ लागणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यातील मतदारांची संख्या 31 लाख 76 हजार 830 असून यात 16 लाख 51 हजार 840 पुरूष, 15 लाख 24 हजार 847 महिला तर 143 इतर मतदारांचा समावेश आहे. 18 ते 19 वयागटातील नव मतदारांची संख्या 78 हजार 721 असून 85 वर्षावरील मतदारांची संख्या 40 हजार 609 एवढी आहे. तर दिव्यांग मतदारांची संख्या 27 हजार 784 असून सैन्य व सेवा दलातील 2 हजार 508 मतदार आहेत. तर मतदान केंद्राची संख्या 3 हजार 273 एवढी असल्याचे त्यांनी नमूद केले. यात शहरात 1290 तर ग्रामीणमध्ये 1983 मतदान केंद्र आहे.

मतदारांना मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा सावलीची व्यवस्था, ,व्हीलचेअर, महिलांसाठी हिरकणी कक्ष, पाळणाघर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

दिव्यांग व 85 वर्षावरील मतदारांना घरबसल्या मतदानाची सोय असेल त्यासाठी त्यांना आधी 12 डी अर्ज सादर करावा लागेल, असे नमूद केले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त... 

पोलिस आयुक्तालय हद्दीत 4 पोलिस उपायुक्त, 7 सहाय्यक पोलिस आयुक्त, 70 पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 3 हजार 500 कर्मचारी, 500 होमगार्ड तसेच एसआरपीएफच्या 4 तुकड्या व केंद्रीय सुरक्षा बलाच्या 2 तुकड्या असा बंदोबस्त असेल, त्यापैकी सुरक्षा बलाच्या दोन तुकड्या आज शहरात दाखल होतील, अशी माहिती पोलिस आयुक्त पवार यांनी दिली. जातीय सलोखा बिघडविण्याचा कोणी प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर 

ग्रामीणमध्ये सहा मतदारसंघ असून या ठिकाणी पोलिस अधिका-यांसह 2 हजार 415 कर्मचारी, 1 हजार 486 होमगार्ड असा बंदोबस्त असेल सोबत एसआरपीएफच्या चार व केंद्रीय सुरक्षा बलाच्या सहा तुकड्या तैनात असेल, अशी माहिती ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. राठोड यांनी दिली. 

विधानसभा निवडणुक कार्यक्रम-

मंगळवार -22 ऑक्टोंबर 2024 -निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी, नामनिर्देशन पत्र सादर होण्यास प्रारंभ

मंगळवार-29 ऑक्टोंबर 2024- नामनिर्देशन सादर करण्याचा अंतिम दिनांक

बुधवार-30 ऑक्टोंबर 2024 - नामनिर्देशपत्र छाननी

सोमवार-4 नोव्हेंबर 2024 - नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत. 

बुधवार-20 नोव्हेंबर 2024 - मतदान

शनिवार-23 नोव्हेंबर 2024 - मतमोजणी 

विधानसभा मतदारसंघ - मतदार संख्या

सिल्लोड - 355280

कन्नड - 330800

फुलंब्री - 365755

औरंगाबाद मध्य - 366284 

औरंगाबाद पश्चिम - 403137

औरंगाबाद पुर्व - 352313

पैठण - 323500

गंगापुर - 361218 

वैजापूर - 318543

एकूण - 3176830

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow