निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
 
                                विधानसभा निवडणूक-2024
निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी आचारसंहितेची
काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज):- विधानसभा 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच प्रशासन सज्ज झाले असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, कार्यालय प्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांना निर्देश देण्यात आले. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीत आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. त्यात आचारसंहिता अंमलात आल्यापासून अनुक्रमे 24, 48 व 72 तासांत करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार,
48 तासात करावयाची कार्यवाही
सर्वच केंद्र शासनाचे व राज्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भुखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पुल, उड्डाणपुल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्णवाहीका 2 इत्यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, मा.खासदार, मा.मंत्री महोदय, राजकीय व्यक्ती इत्यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य, जाहीराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीत करणे.
72 तासात करावयाची कार्यवाही
सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भुखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्थापना व सर्वच खाजगी ठिकाणे, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी वाहने, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, रुग्णवाहीका इत्यादी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्यक्ती इत्यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीत करणे. उपरोक्त नमूद कार्यवाही करण्यासाठीची वरील प्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्थ यंत्रणेमार्फत तात्काळ करण्यात यावी. तसेच विषयांकीत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली.
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले की, महानगरपालिका हद्दीत असलेल्या विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता अंमलबजावणी, मतदार जनजागृती, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधांबाबत पुर्तता करण्यात मनपा प्रशासन सक्रियतेने कामकाज करीत असून यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया कालावधी पाहता सर्व आवश्यक पूर्वतयारी करुन सर्व यंत्रणांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. मतदारांना निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, सर्व विभागांनी आपापसात समन्वय व संवाद राखून आचारसंहिता अंमलबजावणीची व निवडणूक प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करावी. विधानसभा मतदारसंघनिहाय या सर्व कार्यवाहीसाठी सर्व यंत्रणांना समन्वय असणे आवश्यक आहे. सर्व नियमांची माहिती व अभ्यास करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरुन आवश्यकतेनुसार मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध असेल असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            