विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा अर्थसंकल्पावर घणाघाती टीका

हा तर देशोधडीला लावणारा अर्थसंकल्प...
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची घणाघाती टीका
मुंबई, दि.11(डि-24 न्यूज) राज्य सरकारने सोमवारी 2025 - 26 या आर्थिक वर्षांचा सादर केलेला अर्थसंकल्प हा देशोधडीला लावणारा व राज्याला अधोगतीला नेणारा असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
घोषणा आणि थापा या भोवती अर्थसंकल्प फिरत आहे
सरकारला पाहिजे तेच
सरकार जुने नव्याने सांगत आहे
लाडक्या भावाला नोकरी नाही
लाडक्या बहिणीला रक्षण नाही
ना शाळा आहे ना शिक्षण आहे
बळीराजा चे शोषण आहे
शेतकरी त्रस्त आहे, निसर्गावर भिस्त आहे
शासनाची Ai वर भिस्त आहे
ना दिलेल्या आश्वासनाचे भान
ना दिलेल्या वचनाची जाण
सरकार फक्त बडबडे
सोडे पोकळ घोषणांचे बुडबुडे
या कवितेच्या माध्यमातून दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले.
अर्थसंकल्पीय चर्चेवरील भाषणात बोलताना दानवे म्हणाले की , सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा घोषणांचा पाऊस असून वास्तवात महाराष्ट्र राज्य कर्जाच्या खाईत अडकत चालला आहे.
राज्यावर 7 लाख 68 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. 2013 - 14 या वर्षांत 2 लाख 69 हजार कोटी रुपयांचे असलेले कर्ज गेल्या 10 वर्षांत 3 पटीने वाढले आहे.
सरकारचे दरवर्षी 55 हजार कोटी रुपये व्याज फेडण्यासाठी जात असून भांडवली खर्चात 2 टक्के कपात करण्याची वेळ सरकारला आली आहे, असे असताना खर्च वाढवणाऱ्या योजना सरकार कशाप्रकारे राबविणार असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
महसुली तूट 45 हजार 892 कोटी तर राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार 234 कोटी रुपयांवर गेली असून ही चिंतेची बाब असल्याचे दानवे म्हणाले.
वारंवार कर्ज घेऊन खर्च चालविण्याची सवय लागली आहे. उद्योग सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर हा 6.8 % वरून 4.4% वर घसरला आहे.
केंद्राने मदतीसाठीचा हात आखडता घेतला असून जास्त निधी आणण्यास महायुती सरकारला अपयश आल्याची टीका दानवे यांनी केली.
तसेच इतर राज्याच्या तुलनेत राज्याचे दरडोई उत्पन्न 5 व्या क्रमांकावर गेले आहे.
भाजपने जाहीरनाम्यात केलेले 25 ठळक मुद्दे हे निवडणूकीपुरते केले असून त्यांची या अर्थसंकल्पात पूर्तता केली नाही.
जीवनावश्यक गोष्टींचे भाव स्थिर नाही. राज्याची आर्थिक स्थिती पाहता 4 वर्षांत कोणती जादूची काडी फिरवून सरकार
राज्याची अर्थ व्यवस्था 1 ट्रीलियन अमेरीकन डॉलर करणार असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
राज्यातील बंद पडलेले चिपी विमानतळ, शिर्डी विमानतळाची रखडलेली नाईट लँडिंग, प्रतीक्षेत असलेलं अमरावती विमानतळ तसेच राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घोषीत केलेले विविध महामंडळ यांना कोणत्याही निधीची तरतूद केली नसल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात मांडली.
गडचिरोली सुरजागड येथील खनिज संपतीची लूट करून आदिवासी बांधवांवर सरकार अन्याय करत आहे.
जलजीवन विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांना अपुरा निधी, रखडलेला मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रखडलेले रस्ते विकास कामे यावरून दानवे यांनी सरकार वर टीकास्त्र डागले.
सरकारचे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले असून या अर्थ संकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला गेला नाही.
विदर्भ मराठवाडयाच्या विकासासाठी निधीची तरतूद नाही. आपलं कल्याणकारी राज्य राहण्याची आवश्यकता असताना हे सरकार
कर्जबाजारी राज्य करणार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
स्वार्थ संकल्प स्वार्थाचा ध्यास
राज्य लुटण्याला देऊनिया गती
साधुया प्रगती वेगाची
मिळवूनही सारे राज्य लुटू चला
या कवितेच्या ओळीतून दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर ताशेरे ओढले.
What's Your Reaction?






